गोपाळ काल्याच्या कीर्तनाने मुक्ताई पालखी सोहळ्याची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 06:17 PM2020-07-05T18:17:00+5:302020-07-05T18:17:43+5:30
विनायक वाडेकर मुक्ताईनगर , जि.जळगाव : आषाढी एकादशीची वारी संपल्यानंतर पौर्णिमेला पंढरपूरच्या गोपाळपुऱ्यात होणारा गोपाळकाला कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात ...
विनायक वाडेकर
मुक्ताईनगर, जि.जळगाव : आषाढी एकादशीची वारी संपल्यानंतर पौर्णिमेला पंढरपूरच्या गोपाळपुऱ्यात होणारा गोपाळकाला कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात न करता मुक्ताईनगर येथे केवळ १५ तासात स्वगृही पोहोचलेल्या आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी सोहळ्याची सांगता रविवारी गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी झाली. तसेच मुक्ताईनगर येथेही इतर संतांच्या संस्थानप्रमाणेच गोपाळपुरा असावा म्हणून बोदवड रस्त्यावरील आदिशक्ती मुक्ताईच्या पादुका मंदिराजवळच गोपाळपुरा बनवण्याची घोषणा केली.
दरवर्षी संत मुक्ताईची पालखी ही मुक्ताईनगर येथून पंढरपूर व पौर्णिमेनंतर गोपाळकाला झाल्यावर स्वगृही परत फिरते. ३११ वर्षांपासूनच्या या परंपरेसाठी ३४ जिल्हे, १४०० किलोमीटर व ७० दिवसांचा प्रवास हा पायी केला जातो. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांब अंतराची वारी म्हणून आदिशक्ती मुक्ताईची वारी गणली जाते. यावर्षी मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केवळ २० भाविकांसाठी परवानगी मुक्ताई वारीला मिळालेली होती.
रविवारी गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर काल्याचे कीर्तन हभप रवींद्र हरणे महाराज यांनी केले.
पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा या ज्ञानोबारायाच्या कीर्तनाने काल्याचे कीर्तन करतो, तशी वारीची सांगता करण्यात आली. ज्याप्रमाणे पाण्याला कोणताही रंग नसतो मात्र अथांग पाणी दिसते; तेव्हा ते पाणी निळे भासते असेच विठोबाचे रूप विहंगम आहे. ज्ञानोबाराया, विठोबा हे काळ्या अथवा सावळ्या रुपात न दिसता निळ्या रूपात दिसतात. कोरोना विषाणू जीवन जगण्याची दिशाच बदलली असून निगेटिव्हला सन्मान मिळवून देण्याचा जगातला कदाचित पहिलाच प्रकार असावा, असे प्रतिपादन हरणे महाराज यांनी करत आदिशक्ती मुक्ताई म्हणजे गुरू सद्गुरू व जगद्गुरू यांचे रूप असल्याचे वर्णन त्यांनी केले.
काल्याचे कीर्तन म्हणजे वारकऱ्यांसाठी सर्वश्रेष्ठ कीर्तन आहे. देवालाही दुर्लभ असलेला काला हा संतांच्या संगतीमुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो, असे हे दुर्लभ असे भाग्य मानवाला मिळाले म्हणून ‘तुका म्हणे काला दुर्लभ कोणाला’ असा उच्चार करतात. देवांनाही दुर्लभ हा काला सर्वसामान्यांना केवळ संतांच्या संगतीमुळे लाभतो म्हणून तुझे संगती झाली माझी शुद्धी तृप्ती असे गोपाळ काल्याचे वर्णन हरणे महाराज यांनी याप्रसंगी केले.
मुक्ताईनगर येथे गोपाळपुºयाची निर्मिती
देवाचे दर्शन म्हणजेच संत व देवाचे मनोमिलन झाल्यानंतर पौर्णिमेला गोपाळकाला हा केला जातो. काल्याचे कीर्तन हे पंढरपूरच्या गोपाळपुºयात केले जाते, मात्र यावर्षी प्रतिकूल परिस्थितीमुळे प्रशासनाला वेठीस धरून पंढरपूरला थांबण्याऐवजी आपापल्या संस्थानमध्ये जाऊन काला करावा, असे महाराष्ट्रातील मानाच्या नऊ संस्थानच्या पालखीप्रमुखांनी ठरवले होते. त्यामुळे द्वादशीलाच आदिशक्ती मुक्ताईची पालखी १५ तासांचा प्रवास करत नवीन मुक्ताई मंदिरात येऊन विसावली. मात्र काल्याचे कीर्तन झाल्याशिवाय वारीला महत्त्व प्राप्त होत नाही म्हणून मुक्ताईनगर येथे काल्याचे कीर्तन करण्यात आले. महाराष्ट्रातील मानाच्या सर्व संस्थानच्या स्थळी गोपाळपूरची निर्मितीही करण्यात आली. मात्र मुक्ताईनगर येथे गोपाळपुरा नसल्याने आजपर्यंत मुक्ताईनगरात काल्याचे कीर्तन गोपाळपुºयात होऊ शकले नव्हते म्हणून आदिशक्ती मुक्ताईचे नवीन देवस्थान असलेल्या बोदवड रस्त्यावरील आदिशक्ती मुक्ताईच्या पादुका असलेल्या मंदिर स्थळी गोपाळपूरची निर्मिती करण्याची मागणी काल्याच्या कीर्तनप्रसंगी पुढे आली. याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटीलही उपस्थित होते. गोपाळपुरा हा पादुका ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी निर्माण करण्यात यावा, अशी नगर पंचायतकडेही संस्थानतर्फे मागणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशीही अॅड.रवींद्र पाटील यांनी चर्चा केली.
सकाळी आरती व अभिषेक झाल्यानंतर दरवर्षीच्या नियमाप्रमाणे मंदिराला पालखी परिक्रमा घालण्यात आली. आजच्या या सोहळ्यासाठी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, नितीन महाराज, विशाल महाराज खोले, हभप खवले महाराज, निवृत्ती पाटील, विशाल सापधरे, उद्धव जुनारे महाराज, ज्ञानेश्वर हरणे तसेच मुक्ताईच्या स्वरूपात रवींद्र हरणे महाराजांच्या दोन्ही जुळ्या कन्या उपस्थित होत्या.