नियोजनशून्य कारभारामुळे बसस्थानकाची अवस्था वाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:16 AM2021-01-03T04:16:49+5:302021-01-03T04:16:49+5:30

जळगाव : जिल्ह्याचे ठिकाण असलेले जळगाव आगार उत्पन्नात आघाडीवर असले तरी, बस स्थानकाची बाहेरील अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली ...

The condition of the bus stand is bad due to unplanned management | नियोजनशून्य कारभारामुळे बसस्थानकाची अवस्था वाईट

नियोजनशून्य कारभारामुळे बसस्थानकाची अवस्था वाईट

Next

जळगाव : जिल्ह्याचे ठिकाण असलेले जळगाव आगार उत्पन्नात आघाडीवर असले तरी, बस स्थानकाची बाहेरील अवस्था मात्र अत्यंत दयनीय झाली आहे. कॉक्रिटीकरण नसल्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, दगड-गोटे वर आले आहेत. तसेच बस स्थानकाच्या भितीं गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगल्या असून, कानोकोपऱ्यात पडलेल्या कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याचे `लोकमत` प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले.

या आगारामध्ये पहाटे पासून ते रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची वर्दळ सुरू असते. दैनंदिन ६०० फेऱ्या होत असतात. दररोज दहा हजार प्रवासी प्रवास करतात. राज्यातील विविध जिल्ह्यांसह बडोदा, सुरत, इंदौर, अंकलेश्वर या ठिकाणींही महामंडळाची सेवा असल्यामुळे या आगाराला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. मात्र, आगार प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशांना मुलभूत सुविधादेखील व्यवस्थित मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. स्थानकात पुरूष व महिलासांठी स्वतंत्र शौचालय असले तरी, त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. कचरा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन नसल्यामुळे, अनेक ठिकाणी कानाकोपऱ्यात कचरा साचलेला दिसून आला. स्थानकाची मुख्य इमारतही दिवसेंदिवस जीर्ण होत असून, इमारतीच्या एका बाजूला भिंतीला पूर्णपणे तडे गेले आहेत. तसेच सांडपाण्याचे पाईप फुटल्यामुळे प्र‌वाशांच्या दुर्गंधी सहन करावी लागत असल्याचे दिसून आले.

दररोजच्या बसफेऱ्या : ६००

दररोजची प्रवासी संख्या : १० हजार

इन्फो :

शौचालय, मुतारी आहेत, मात्र प्रचंड दुरवस्था :

-आगारामध्ये महिला व पुरुषासांठी स्वतंत्र शौचालये आहेत. मात्र, दोन्ही ठिकाणच्या शौचालयांचे अनेक ठिकाणी दरवाजे खिळखिळे झाले आहेत.

-बाहेरील प्रवाशांना अंघोळ करायची असेल तर, या ठिकाणी स्वतंत्र अशी कुठलीही व्यवस्था नाही

-पुरूष मुतारींच्या ठिकाणी स्वच्छते अभावी, नेहमी दुर्गंधी येत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. याचा आरोग्यावर परिणाम होत आहे.

- रात्रीच्या वेळी या ठिकाणी लाईटची व्यवस्था नसल्यामुळे अंधार असतो, परिणामी प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले.

::

इन्फो :

पार्किंगची समस्या नेहमीचीच

आगारामध्ये प्रवाशांना वाहने पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे, प्रवासी थेट आगारातच वाहने पार्किंग करत आहेत. आगारात दररोज १५० ते २०० दुचाकी पार्किंग करण्यात येत असल्यामुळे याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे चालकानांही बसेस काढतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

इन्फो

आगारात फक्त बसण्यासाठी प्रवाशांना बाक चांगले आहेत. इतर कुठल्याही मुलभूत सुविधा व्यवस्थित नाहीत. जागोजागी दगड-गोटे वर आल्यामुळे पाय घसरून पडण्याची भिती असते. प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

सुरज महाले, प्रवासी.

::

पुरूषांसाठी स्वतंत्र शौचालय असले तरी, आतून दुर्दशा झाली आहे. मुख्य इमारतीलाही अनेक ठिकाणी तडे गेलेले दिसत आहेत. एका ठिकाणी सांडपाण्याचा पाईप फुटल्यामुळे बऱ्याच वेळा सांडपाणी रस्त्यावर येत असते. यामुळे खुप त्रास होतो.

रमेश सोनार, प्रवासी.

:

इन्फो :

आगार प्रशासनातर्फे स्थानकातील विविध समस्यांची कामे करण्याबाबत स्थापत्य विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर कामांना तात्काळ सुरूवात करण्यात येईल.

नीलेश पाटील, आगार व्यवस्थापक. जळगाव आगार .

Web Title: The condition of the bus stand is bad due to unplanned management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.