रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल; बाहेर नातेवाईक बेहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:15 AM2021-04-13T04:15:46+5:302021-04-13T04:15:46+5:30
काय करावे काही समजेना : चिंतेने रात्री झोपही लागेना लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या महिनापासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा ...
काय करावे काही समजेना : चिंतेने रात्री झोपही लागेना
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या महिनापासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने रुग्णांना बेड अपूर्ण पडत आहेत. काही ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपचार व्यवस्थित मिळत असले तरी कोरोनाच्या धास्तीने कोविड रुग्णांचे रुग्णालयात अधिकच हाल होत असून, दुसरीकडे रुग्णालयाबाहेर थांबून असलेल्या नातेवाइकांच्या जेवणाचा किंवा झोपण्याचा ठावठिकाणा नसल्यामुळे त्यांचेही अधिकच हाल होत असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले. यावेळी या रुग्णांच्या नातेवाइकांनी कोरोनाबाधित रुग्णाच्या चिंतेमुळे रात्री बाहेर झोपही लागत नसल्याची व्यथा ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर सध्या जिल्हा रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिक याच ठिकाणी उपचार घेत आहेत. यात रुग्णांसोबत असणारे नातलगही जिल्हा रुग्णालयाच्या समोर असलेल्या सेवालयात मुक्काम करत आहेत. या ठिकाणी तात्पुरती बसण्याची व्यवस्था आहे. मात्र, झोपण्याची ना जेवणाची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे रुग्णालयातील रुग्णासोबत असलेल्या या नातलगांचेही हाल होत आहेत. रात्रीच्या वेळी उघड्यावरच डासांच्या प्रादुर्भावात झोपावे लागत आहे. त्यात आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या आपल्या नातलगाच्या चिंतेमुळे आमच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे या नातलगांनी सांगितले.
नातेवाइकांच्या प्रतिक्रिया
- माझी आई कोरोनातून बरी झाली. मात्र, त्या नंतर पुन्हा तिला श्वसनाचा त्रास झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या ठिकाणी फक्त रुग्णालाच जेवण मिळत असल्याने बाहेरून जेवण घ्यावे लागते. तर रुग्णालयाच्या बाहेरचे उघड्यावर झोपावे लागत आहे.
मुकुंदा पाटील,
कोरोना झाल्यामुळे भाऊला आयसीयूमध्ये दाखल केले आहे. त्या ठिकाणी जाता येत नसल्याने, बाहेरच थांबून आहे. भावाच्या तब्येतीची खूप काळजी वाटत असल्याने कशातच मन लागत नाही. रुग्णाच्या नातलगांना जेवणाची व झोपण्याची कुठलीही व्यवस्था नसल्याने याचा आरोग्यावरही परिणाम होत आहे.
अनिता मोची
माझ्या आईची तब्येत बरी नसल्याने खूप काळजी वाटत आहे. चिंतेने रात्री झोपही लागत नाही. सरकारी रुग्णालय म्हटल्यावर सर्व सुविधा घराप्रमाणे कशा मिळणार, त्रास तर सहन करावा लागणार आहे.
स्वप्नील गवई
इन्फो :
नातेवाइकांकडे जात येत नाही आणि दुकानात काही मिळतही नाही
यावेळी या नातलगांनी आपली आपबिती कथन करताना सांगितले की, सध्या कोरोनाच्या भयावह परिस्थितीमुळे शहरात नातलग राहूनही त्यांच्याकडे जात येत नाही. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दुकाने बंद असल्याने दुकानात काही मिळतही नसल्याने कसेबसे दिवस काढत असल्याचे सांगितले.