व्हेंटिलेटरची अवस्था बिकट...जीएमसीत पुन्हा वेटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:15 AM2021-04-13T04:15:51+5:302021-04-13T04:15:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सुरुवातीला अगदी सौम्य वाटणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सुरुवातीला अगदी सौम्य वाटणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा व्हेंटिलेटरचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरच उपलब्ध होत नसल्याने, शिवाय शासकीय यंत्रणेतही पुरेशी जागा नसल्याने रुग्णांना पर्यायाने नातेवाइकांना दिवसभर भटकंती करावी लागत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी थोडी सुरळीत स्थिती होती. मात्र, सोमवारी पुन्हा परिस्थिती बिकट झाली होती. अनेक रुग्णांना वेटिंगवर थांबावे लागत होते. जागा कमी आणि रुग्ण अधिक अशी बिकट परिस्थिती दोन्ही यंत्रणांमध्ये असल्याने मोठ्या अडचणींचा रुग्णांना सामना करावा लागत आहे.
मोहाडी रुग्णालयाकडे लक्ष
मोहाडी रुग्णालयात ऑक्सिजन बेडची व्यवस्था असून, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम, तसेच सहा ड्युुरा सिलिंडरही कार्यरत करण्यात आले आहेत. मात्र, या ठिकाणी फिजिशियन मिळत नसल्याने गंभीर किंवा मध्यम स्वरूपाच्या रुग्णांना दाखल करण्यात येत नाही. त्यामुळे ही यंत्रणा कधी कार्यान्वित होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वॉर रूमही हतबल
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बेड मॅनेजमेंट यंत्रणा, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूममधूनही एकदम हतबल असल्याप्रमाणे उत्तरे मिळत आहेत. रुग्ण आशेने या यंत्रणेला फोन करीत असून त्यांच्याकडूनही कुठेच उपलब्धता नाही, असे सांगण्यात येत आहे. शिवाय अनेक वेळा या ठिकाणाहून डॉक्टरांचे नंबर दिले जातात. मात्र, ते नंबर बंद असतात, अशी विरोधाभास असलेली स्थिती आहे. त्यामुळे रुग्णांना आता दाखल कुठे करावे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.