महाविकास आघाडीत अंतर्विरोध प्रबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:34 PM2020-01-12T12:34:11+5:302020-01-12T12:35:25+5:30

शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेस या तीन स्वतंत्र पक्षांमध्ये समन्वय राखण्यासाठी व्यवस्थेचा अभाव , मुक्ताई साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणातून दरी उघड ; नंदुरबारात आघाडीचे अस्तित्व शिवसेनेच्या हाती

Conflict prevails in the development front | महाविकास आघाडीत अंतर्विरोध प्रबळ

महाविकास आघाडीत अंतर्विरोध प्रबळ

Next

मिलिंद कुलकर्णी
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्टÑात वेगवेगळ्या विचारांचे पक्ष ‘महाविकास आघाडी’च्या छताखाली एकत्र आले. सरकारची सुरुवात अडखळत आणि संथ आहे, तीच स्थिती जिल्हा पातळीवर लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात आहे. एकमेकांविरुध्द लढून निवडून आल्यानंतर त्याच पक्षासोबत सत्ता राबवायची म्हटल्यावर खडखडाट होणार आहे, ते अपेक्षित आहे. परंतु, मुक्ताईनगर साखर कारखान्याच्या कर्जप्रकरणावरुन सेनेच्या दोन लोकप्रतिनिधींमधील दरी आणि कॉंग्रेस-राष्टÑवादीच्या संचालकांचे खडसेंना समर्थन ठळकपणे समोर आले.
महाविकास आघाडी सरकारमधील सहभागी पक्ष शिवसेना तसेच राष्टÑवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. दोन्ही काँग्रेसची विचारधारा, कार्यपध्दती एकसमान आहे. पण शिवसेना या दोघांपासून भिन्न आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता थोडा खडखडाट, वादविवाद, अंतर्विरोध अपेक्षित आहे. ते वाढू नये, याची काळजी घेण्यासाठी राज्यस्तरापासून तर जिल्हा स्तरापर्यंत समन्वय, सुकाणी समिती गठीत करण्याची आवश्यकता वाटू लागली आहे.
भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी पक्षनेतृत्वाविरुध्द बंड पुकारले आहे. स्वाभाविकपणे इतर पक्षांना त्यांच्याविषयी ममत्व वाटणारच. परंतु, त्यांच्या मतदारसंघातील मूळ शिवसेनेचे परंतु, राष्टÑवादी समर्थित अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताई साखर कारखान्याला जिल्हा बँकेकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाविषयी आक्षेप घेतला. परंतु, संचालक मंडळात असलेल्या शिवसेनेच्या तसेच दोन्ही काँग्रेसच्या संचालकांनी कोणताही विरोध न करता कर्ज मंजूर केले. खडसे यांच्याविरोधात संघर्ष करणारे नेते आणि कार्यकर्ते मुक्ताईनगरात आहेत, त्यांना नव्या सरकारकडून बळ मिळाले नाही, तर लढाई लढायची तरी कशाला, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण होईल. संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पाटील हे आमचेच आहेत, असे जाहीर केले होते. मग तरी आमदार पाटील एकाकी का पडले, हा प्रश्न आहेच. तेथील कॉंग्रेस, राष्टÑवादीची अवस्था तशीच झाली आहे. राज्य पातळीवरील नेते खडसेंशी चांगले संबंध ठेवतात आणि संघर्षासाठी केवळ स्थानिक कार्यकर्त्यांनी लढावे, ही अपेक्षा ठेवण्यात काय हशील? असा संघर्ष केवळ मुक्ताईनगरात नाही तर प्रत्येक ठिकाणी होणार आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्तेची चावी आता शिवसेनेच्या हाती आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सेनेचे बळ वाढले. विधानसभा निवडणुकीत आमशा पाडवी यांनी चांगली लढत दिली. जि.प.निवडणुकीत ७ जागा जिंकल्या. आघाडीधर्मानुसार सेना काँग्रेसकडे जायला हवी, आणि रघुवंशी हे मूळ काँग्रेसी असल्याने त्यांचे सुरुपसिंग नाईक, के.सी.पाडवी या नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. पण ते आता सेना नेत्याच्या भूमिकेत असल्याने पक्षाचे सदस्य, कार्यकर्ते यांना सत्तेत वाटा मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहतील. विधानसभा निवडणुकीत रघुवंशी यांचे भाजप नेते डॉ.विजयकुमार गावीत यांच्याशी असलेले संबंध सुधारले. युतीधर्माचे पालन दोघांनी केले. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजप-शिवसेना एकत्र येऊ शकते. अशी उदाहरणे आहेत. दोन्ही शक्यता आहेत. त्यामुळे काय निर्णय होतो, यावर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी २३ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या ७ सदस्यांच्या समर्थनाशिवाय कोणाचीही सत्ता येऊ शकणार नाही, अशी स्थिती आहे. चंद्रकांत रघुवंशी हे सेनेचे नेते असून ते पक्षनेतृत्वाशी चर्चा करुन निर्णय घेणार आहेत. रघुवंशी मूळ काँग्रेसी असल्याने काँग्रेसला पाठिंबा दिल्यास आघाडी मजबूत होईल. भाजपला पाठिंबा दिल्यास वेगळे समीकरण तयार झाल्याचा संदेश राज्यभर होईल. या आठवड्यात चित्र स्पष्ट होईल.

Web Title: Conflict prevails in the development front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.