जळगावात बालकाचा मृत्यू झाल्याने गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 01:00 PM2018-09-08T13:00:27+5:302018-09-08T13:01:09+5:30

डॉक्टरांचा हलगर्जीपणा

Confusion due to child's death in Jalgaon | जळगावात बालकाचा मृत्यू झाल्याने गोंधळ

जळगावात बालकाचा मृत्यू झाल्याने गोंधळ

Next
ठळक मुद्देमुक्ताईनगरच्या कुटुंबीयांचा आरोपडॉक्टरावर कारवाईची मागणी

जळगाव : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अर्नव नीलेश पाटील (रा़ मुक्ताईनगर) या ४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता कुटुंबीयांनी गोंधळ घातला़ हा प्रकार मू़जे़ महाविद्यालय परिसरातील शिवम हॉस्पीटल येथे घडला़
दरम्यान, डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली़ बालकाच्या श्वास नलिकेत आधीपासून काही तरी अडकले असल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ़ पंकज पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
कुटुंबीयांनी दिलेली माहिती अशी की, मुक्ताईनगरातील नीलेश पाटील यांनी मुलगा अर्नव यास निमोनिया झाल्यामुळे त्यास मुक्ताईनगर नंतर भुसावळ व अखेर ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी जळगावातील शिवम हॉस्पीटल येथे उपचारार्थ दाखल केले़
अर्नव यास श्वास घेण्यास त्रास होत होता़ मात्र, एक दिवस उपचार घेतल्यानंतर अर्नवच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली़ शुक्रवारी पुन्हा त्यास श्वास घेण्यास त्रास होऊ लागला़ त्यामुळे हा त्रास का होतो हे तपासण्यासाठी डॉ़ पंकज पाटील यांनी कुटुंबीयांना अर्नव यांचे सिटीस्कॅन करण्यास सांगितले़
दुपारी १२ वाजता सिटीस्कॅनसाठी बालकास नेले़ परंतू, तो हालचाल करीत असल्यामुळे त्यास भूलचे इंजेक्शन देण्यात आले़ यानंतर पुन्हा भूल देण्यात आली़ सिटीस्कॅन झाल्यानंतर बालकास रूग्णालयात नेण्यात आले़ रूग्णालयात आल्यानंतर बालकाचा मृत्यू झाला़
डॉक्टरावर कारवाईची मागणी
बालकाचा मृत्यू होताच कुटुंबीयांनी रूग्णालयात हंबरडा फोडला. डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला व कारवाईची मागणी केली. एक ते दीड तास हा गोंधळ सुरू होता़
रूग्णालयात आलेल्या पोलिसाने बालकाच्या नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न देखील केला़ यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी धाव घेतली़ यावेळी डॉक्टरांनाही बोलविण्यात आले़ कुटुंबीयांनी घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला़ मात्र, याबाबत पोलीस ठाण्यात कुठलीही तक्रार देण्यात आलेली नाही़

५ सप्टेंबरला बालकास उपचारार्थ दाखल केले होते़ दुसऱ्याच दिवशी प्रकृतीत सुधारणा झाली़ मात्र, शुक्रवारी बसल्यावर श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे बालकास सिटीस्कॅनसाठी पाठविले़ मात्र, बालकाच्या हालचालीमुळे सिटीस्कॅन बरोबर झाले नाही़ ताप आल्यामुळे त्यास इंजक्शन सुध्दा दिले होते़ दरम्यान, श्वास नलिकेत काही तरी अडकलेले होते़ त्यामुळे बालकाचा मृत्यू झाला़
-डॉ़ पंकज पाटील़

Web Title: Confusion due to child's death in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.