पोलिसांनी डान्स करायला लावलेल्या वसतिगृहात चौकशी समितीसमोरच गोंधळ !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 06:12 AM2021-03-04T06:12:18+5:302021-03-04T06:12:40+5:30
पाच मुलींना निरीक्षणगृहात हलविले. नियुक्त केलेल्या चौकशी समितीसह भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, नगरसेविका सरिता नेरकर यांनीही बुधवारी सकाळी वसतिगृहात धाव घेऊन मुलींशी चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय आशादीप महिला वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. इकडे जळगावात जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने बुधवारी वसतिगृहात धाव घेतली असता त्यांच्यासमोरच तक्रारदार मुलीने पत्रकारांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला बोलण्यापासून रोखण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला.
जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल शासनाला रवानाही झाला असून त्यात घेतलेल्या जबाबात आक्षेपार्ह काही आढळले नसल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘लोकमत’ला दिली. तरीही सखोल चौकशी सुरू राहणार असल्याचे सांगितले.
नियुक्त केलेल्या चौकशी समितीसह भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, नगरसेविका सरिता नेरकर यांनीही बुधवारी सकाळी वसतिगृहात धाव घेऊन मुलींशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती गठीत केली आहे. या समितीने वसतिगृहाच्या अधीक्षक, परिविक्षाधीन महिला अधिकारी तसेच वसतिगृहातील महिला व मुलींची चौकशी केली. दरम्यान, ज्या मुलीने सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रार केली, त्याच मुलीने तीन गरोदर मुलींना मारहाण केली. त्यामुळे या मुलींना तसेच अन्य दोन मुलींनीही मागणी केल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निरीक्षणगृहात पाठविण्यात आले असून एका तक्रारदार मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. रहिवासी, वसतिगृहाचे कर्मचारी, तेथील मुली यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीतही तफावत आढळून आली.
रहिवासी म्हणतात, दोन वर्षांपासून त्रास वाढला
‘लोकमत’ने वसतिगृहाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांकडून माहिती घेतली असता, देवेंद्र मोरदे यांनी सांगितले की, दोन वर्षांपासून संस्थेत खूप वाईट प्रकार होत आहेत. मंगळवारी दुपारी संस्थेत येऊन गोंधळ घालणाऱ्या पुरुष व महिलांविरुद्ध संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हापेठ पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे.