वॉटर ग्रेसच्या विषयावरून महासभेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:16 AM2021-05-13T04:16:08+5:302021-05-13T04:16:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या बुधवारी झालेल्या ऑनलाईन महासभेत सत्ताधारी शिवसेनेने मुदत संपलेल्या गाळ्यांसह वॉटरग्रेस कंपनी व मनपा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या बुधवारी झालेल्या ऑनलाईन महासभेत सत्ताधारी शिवसेनेने मुदत संपलेल्या गाळ्यांसह वॉटरग्रेस कंपनी व मनपा प्रशासनात लवाद नेमण्याचा विषय बहुमताने मंजूर केला. सभा ऑनलाईन असल्याने बहुमत कसे सिध्द झाले ? असा प्रश्न विचारत भाजपाचे संतप्त सदस्य थेट मनपा सभागृहात घुसल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यात सेनेचेही सदस्य सभागृहात आल्याने दोघा गटात आरोप प्रत्यारोप झाल्याने गोंधळात भर पडली.
महापालिकेची बुधवारी ऑनलाईन महासभा पार पडली. या महासभेत महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळ्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासह, शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनी आणि महापालिका प्रशासनात लवाद नेमण्याच्या विषयावरून भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. शिवसेनेने हे दोन्ही विषय बहुमताच्या जोरावर मंजूर केले. मात्र, महासभा ऑनलाईन असताना बहुमत कसे सिद्ध केले, असा जाब विचारत भाजपचे काही सदस्य थेट सभागृहात दाखल झाले. यावेळी दोन्ही पक्षातील सदस्य आक्रमक झाल्याने जोरदार गोंधळ उडाला.
ऑनलाईन पद्धतीने मतदान घेऊनच विषय मंजूर करा
महासभेत गाळ्यांचा विषय बहुमताने मंजूर झाल्यानंतर वॉटर ग्रेस प्रकरणी लवाद नेमण्याच्या प्रस्तावाला देखील शिवसेनेने मंजुरी देत, हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करून घेतला. त्यानंतर भाजपचे गटनेते भगत बालाणी, सदस्य कैलास सोनवणे, ॲड. शुचिता हाडा, विशाल त्रिपाठी, धीरज सोनवणे यांनी ऑनलाईन पद्धतीने विरोध नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळात हा विषय मंजूर झाला. त्यामुळे संतप्त भाजपच्या नगरसेवकांनी हुकूमशाही पद्धतीने ठराव मंजूर करून घेतले जात असल्याचा आरोप केला. तसेच ऑनलाइन पद्धतीने मतदान घेऊन या विषयाला मंजुरी किंवा ना मंजुरी द्यावी अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली.
भाजप सदस्य घोषणा देत घुसले सभागृहात
मात्र सत्ताधाऱ्यांनी हा विषय मंजूर करून घेतल्यानंतर, भाजपचे सदस्य कैलास सोनवणे, भगत बालाणी, धीरज सोनवणे सभा बंद करा, बंद करा अशा घोषणा देत थेट सभागृहात दाखल झाले. त्यांनी हे दोन्ही विषय बहुमताने मंजूर केल्याबाबत आक्षेप घेतला. शिवसेनेने बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने वाद झाला. थेट महापौरांच्या व्यासपीठावर जाऊन भाजप सदस्यांनी आपला संताप व्यक्त केला.
सेनेचे सदस्यही सभागृहात आल्याने गोंधळ
हा गोंधळ वाढत गेल्याने शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, सदस्य प्रशांत नाईक, विष्णू भंगाळे, गटनेते अनंत जोशी, नितीन बरडे, गणेश सोनवणे हे देखील सभागृहात दाखल झाले. त्यामुळे गोंधळ वाढला. त्यानंतर महापौर जयश्री महाजन यांनी ही महासभा ऑनलाईन असल्याने सदस्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले. तेव्हा वाद मिटला. काही काळासाठी महासभेचे कामकाज देखील थांबले होते. वाद थांबल्यानंतर सभा पूर्ववत सुरू होऊन, पुढील विषयांवर चर्चा सुरू झाली.
वॉटर ग्रेस लवाद प्रकरणी भाजपची तटस्थ भूमिका
शहराच्या दैनंदिन साफसफाई करणाऱ्या वॉटर ग्रेस कंपनी व महापालिका प्रशासनातील वादाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी लवाद नेमण्याचा प्रस्ताव महासभेपुढे प्रशासनाकडून मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर भाजपच्या नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी आक्षेप घेत, हा विषय मनपा प्रशासनाने आपल्या पातळीवर मंजूर करून घेण्याच्या विषय होता. हा प्रस्ताव महासभेपुढे सादर करण्याची कोणतीही गरज नव्हती. कारण हा ठेका देताना नियम व अटी याबाबतचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला होता , तेव्हा सभागृहाला विचारण्यात आले देखील नव्हते. त्यामुळे या विषयावर देखील प्रशासनाने निर्णय घेण्याची गरज होती, असे सांगत ॲड. हाडा यांनी भाजपची भूमिका जाहीर केली. तसेच भाजपने या विषयावर देखील आपली तटस्थ भूमिका असल्याचे जाहीर केले.