वीजपुरवठा खंडित झाल्याने जीएमसीत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:14 AM2021-03-22T04:14:45+5:302021-03-22T04:14:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अर्धा तास वीजपुरवठा खंडित झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अर्धा तास वीजपुरवठा खंडित झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सीटू या कोरोनाबाधित रुग्णांच्या कक्षात मोठा गोंधळ उडाला होता. रुग्णांचे नातेवाईक थेट मोबाधलचा टॉर्च लावून थेट कक्षात गेल्याने या ठिकाणी प्रचंड गर्दी उसळली होती. दरम्यान, अशातच एका गंभीर रुग्णाचा मृत्यू झाल्याने अधिकच गोंधळ वाढला होता.
शनिवारी शहरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा अशा अचानक खंडित झाल्याने जनरेटरची व्यवस्था रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत करण्यात आली आहे. मात्र, सीटू कक्षाबाहेर असलेल्या जनरेटर कार्यान्वित नसल्याने हा कक्षही अर्धा तास अंधारात होता. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते.
व्हेंटिलेटर्सला बॅकअप
सीटू कक्षात चार रुग्णांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते, वीजपुरवठा खंडित झाल्याने हे बंद होता की काय, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत होती. मात्र, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही तासभर व्हेंटिलेटर्सचा बॅकअप असतो. ते असे अचानक बंद होत नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले. ज्या रुग्णाचा मृत्यू झाला तो आधीच गंभीर होता, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
ऑक्सिजन पाइपलाइनला अडचण नाही
वीजपुरवठा खंडित झाल्यावर ऑक्सिजन पाइपलाइनला कुठलीच अडचण नसते, मात्र, कक्षामध्ये अंधार झाल्यास गोंधळ उडतो. रुग्णालयातील सर्व आपात्कालीन कक्षांमध्ये जनरेटरची व्यवस्था असल्याने त्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यावर अडचण येत नाही. मात्र, सीटू कक्षाबाहेरील जनरेटर गेल्या काही महिन्यांपासूनही एनआरएचमच्या अधिकाऱ्यांनी अद्याप सुरूच केले नसल्याने, शिवाय याकडे वरिष्ठांचेही दुर्लक्ष झाल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली होती, असेही सांगण्यात येत आहे.