जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:19 AM2021-01-16T04:19:50+5:302021-01-16T04:19:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी अर्ज करून सुध्दा शुक्रवारी प्रवेशाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुध्दा जात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी अर्ज करून सुध्दा शुक्रवारी प्रवेशाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुध्दा जात पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे शुक्रवारी दुपारी तीन वाजता संतप्त विद्यार्थ्यानी जात पडताळणी कार्यालयात गोंधळ घातल्याचा प्रकार घडला.
व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला गेल्या काही दिवसांपासून सुरूवात झाली आहे़ उच्च शिक्षणात शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यक असते. त्यासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी कार्यालयात ऑनलाईन अर्ज करून त्याची हार्डकॉपी सादर करावी लागते. गेल्या काही महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील एमबीए व अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणीसाठी अर्ज केला होता़ मात्र, अनेकवेळा चकरा मारून सुध्दा प्रमाणपत्र मिळत नव्हते. अखेर शुक्रवारी प्रवेशाची शेवटची तारीख येऊन धडकली. या दिवशीही सकाळपासून येऊन प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे प्रवेशापासून वंचित राहू या भीतीने विद्यार्थी संतप्त झाले. दुपारी उशिरापर्यंत काहीच हालचाली न झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी जात पडताळणी कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला. पावती देण्यात यावी अन्यथा मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती.
अध्यक्ष दिसेना ना कर्मचारी...
पाच ते सहा महिन्यांपासून अर्ज केले आहेत़ मात्र, वारंवार पडताळणी कार्यालयात आल्यानंतर प्रमाणपत्र तयार नसल्याचे सांगण्यात आले. जात पडताळणी अध्यक्षही दिसले नाही तर कर्मचारीसुद्धा दिसले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास कर्मचाऱ्याने कामाला सुरुवात केली. त्यातही उशीर केला, असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी त्यावेळी केला. ढिसाळ कारभारामुळे हेलपाटे मारावे लागल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. मुदतीत प्रमाणपत्र जमा न केल्यास अधिकचे पैसे द्यावे लागतील, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहोत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न
वारंवार जात पडताळणी कार्यालयात चकरा मारूनसुद्धा प्रमाणपत्र मिळत नव्हते़ मुदतीत प्रमाणपत्र सादर केले तर कमी फी मध्ये प्रवेश होईल, अन्यथा ८७ हजार रूपये भरावे लागतील. एवढी रक्कम कुठून भरायची. गुरूवारी पुन्हा कार्यालयात विचारणा केली असता, प्रमाणपत्र मिळाले नाही. या नैराश्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे एका विद्यार्थिनीने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना साधला संपर्क
विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याची माहिती कळाल्यानंतर राष्ट्रवादीचे अॅड. कुणाल पवार हे कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून लागलीच जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना संपर्क साधला. नंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना संपर्क साधून संपूर्ण हकीकत सांगितली. दरम्यान, मुदतवाढी संदर्भात बैठक सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर गोंधळ कमी झाला.
प्रभारी राज सुरू
धुळ्याचे जात पडताळणी कार्यालयाचे अध्यक्ष नंदकुमार बेंडसे यांच्याकडे नंदुरबार व जळगाव कार्यालयाचाही अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे त्यांची जळगाव कार्यालयात कमी उपस्थिती असते. कर्मचारी सुद्धा वेळेवर उपस्थित राहत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. दरम्यान, वैद्यकीय रजेवर असल्याचे समितीच्या सचिव वैशाली हिंगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पोलिसांनी घातली समजूत
जात पडताळणी कार्यालयात विद्यार्थ्यांचा प्रचंड गोंधळ सुरू झाल्याचा प्रकार कळताच रामानंदनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुपारी कार्यालय गाठले होते. मात्र, त्रुटी काढून देण्यात आल्यानंतर व मुदतवाढीचे आश्वासन मिळाल्यानंतर गोंधळ शांत झाला होता.