साकळी येथील लसीकरण केंद्रावर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:22 AM2021-08-28T04:22:05+5:302021-08-28T04:22:05+5:30
चुंचाळे, ता.यावल : साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोरोना लसीकरण केंद्रावर वशिल्याने लसीकरण होत आहे तर काहीजण रांगेत ...
चुंचाळे, ता.यावल : साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोरोना लसीकरण केंद्रावर वशिल्याने लसीकरण होत आहे तर काहीजण रांगेत उभे न राहता लस घेऊन जात आहे, असे आरोप करीत लसीकरणासाठी केंद्राबाहेर उभ्या आलेल्या काही नागरिक व महिलांनी संताप व्यक्त करून गोंधळ केला. दरम्यान केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु मात्र नागरिक समजण्याच्या पलीकडे असल्याने लसीकरण काहीवेळ बंद करण्यात आले.
यावेळी गोंधळ एवढा होता की शेवटच्या टप्प्यात महिला व नागरिकांनी अक्षरशः ढकलाढकली करून केंद्रात प्रवेश मिळवला. 'लस फक्त १०० तर येणारे त्यापेक्षा जास्त 'अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती. तेव्हा लसीचा पुरवठा मुबलक प्रमाणात व्हावा व लसीकरण सुरळीतपणे करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
येथे भल्या पहाटे पाच वाजेपासून नागरिकांनी लसीकरण्यासाठी रांगा लावलेल्या होत्या. सकाळी जवळपास साडे-दहा वाजेपासून लसीकरणास सुरुवात झाली होती. तेव्हा रांगेत उभे राहात मागे-पुढे होण्यावरून नागरिकांचे किरकोळ वाद होत होते. शेवटच्या टप्प्यात १५ ते २० डोस शिल्लक असताना काही जण रांगेत उभे न राहता वशिलेबाजीवरून ६० ते ७० नागरिकांनी मोठा गोंधळ केला. यावेळी केंद्राच्या लोखंडी प्रवेशद्वारामधून अर्धवट उघड्या भागातून नागरिक संतप्त भावना व्यक्त करत लोटालोटी करत केंद्रामध्ये घुसले. यावेळी अक्षरशः एक-दोन वयोवृद्ध महिला खाली पडल्या. सकाळपासून रांगेत थांबूनही लस न मिळाल्याने नागरिक एकच आरडाओरड करीत होते. दरम्यान यावेळी केंद्रावर एकही पोलीस कर्मचारी अथवा होमगार्ड हजर नव्हता.
दरम्यान ही गोंधळाची परिस्थिती पाहता केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती कवडीवाले व त्यांचे आरोग्य कर्मचारी नागरिकांना शांत करीत होते. मात्र नागरिक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने काही वेळ लसीकरण बंद करण्यात आले होते. त्यानंतर उर्वरित नागरिकांना लसीकरण झाले तर काही जणांना लस न मिळाल्याने घरी माघारी जावे लागले.
लस अधिक प्रमाणात उपलब्ध व्हावी. तर नोकरी, शिक्षण, रोजगाराच्या निमित्ताने अनेक तरुणांना बाहेरगावी जावे लागते. त्या ठिकाणी लस घेतल्याचा पुरावा लागतो त्यामुळे तरुणांना प्राधान्यक्रमाने लसीकरण होणे गरजेचे आहे, असे बोलले जात आहे.
साकळी व त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरणास मोठा प्रतिसाद मिळत आहे. लस कमी उपलब्ध होत असल्याने आरोग्य प्रशासनाला ताण येतो व नागरिकांच्या संतापाला नेहमी सामोरे जावे लागत असते, असे वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील यांनी सांगितले.