वॉटरग्रेस कंपनीचा सावळागोंधळ सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:13+5:302021-06-30T04:11:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता दिलेल्या वॉटरग्रेस कंपनीकडून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी मातीचा वापर करण्याचे काम ...

The confusion of the Watergrass Company continues | वॉटरग्रेस कंपनीचा सावळागोंधळ सुरुच

वॉटरग्रेस कंपनीचा सावळागोंधळ सुरुच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता दिलेल्या वॉटरग्रेस कंपनीकडून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी मातीचा वापर करण्याचे काम अद्यापही सुरुच आहे. आता शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी स्वत: याबाबतचा व्हिडीओ तयार करून हा प्रकार उघडकीस आणला आहे. वॉटरग्रेसला मनपाने नव्याने संधी दिल्यावर वॉटरग्रेसविरोधात नगरसेवकांचा आवाज कमी झाला आहे. तरी शहरातील साफसफाईची समस्या कायम असून कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वजन वाढविण्यासाठी होत असलेल्या जुगाडावर कोणीही बोलायला तयार नसल्याचे दिसून येत आहे.

शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात रविवारी व सोमवारी देखील वॉटरग्रेस कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून थेट कचऱ्याऐवजी माती उचलली जात होती. याबाबत शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी या प्रकाराचा व्हिडीओ तयार केला असून, मनपा सहाय्यक आयुक्त पवन पाटील यांना पाठवून याबाबत तक्रार देखील केली आहे. याआधी देखील राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी देखील मनपाकडे या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली होती. अनेक महिन्यांपासून शहरात संबधित कंपनीकडून असे प्रकार सुरु असून, याकडे कोणताही नगरसेवक व प्रशासन देखील दुर्लक्ष करत आहे.

वजनाच्या मापात ‘पाप’

वॉटरग्रेसला मक्ता दिल्यानंतर मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी त्यात माती, दगड, वृक्षांच्या फांद्या देखील टाकल्या जात आहे. मनपाने कचऱ्याचा एका टनासाठी ९७० रुपये दर निश्चित केला आहे. दररोज शहरातून सरासरी २७० टन कचरा उचलला जात आहे. अनेकदा ३०० टन पर्यंत कचरा उचलला जात आहे. कचऱ्याचा मापात ‘पाप’ करून मोठ्या रक्कमेचे बीलं मनपाकडून वसुल केले जात आहेत. सुरुवातीला नगरसेवकांकडून विरोध होत असल्याने त्यावर काही प्रमाणात अंकुश होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात नगरसेवकांचा विरोध कमी झाल्याने मक्तेदाराला मोकळे रानच मिळाले आहे.

मनपा प्रशासनाचेही दुर्लक्ष

या प्रकाराकडे मनपा प्रशासन देखील फारसे गांभिर्याने लक्ष द्यायला तयार नाही. विशेष म्हणजे वॉटरग्रेसला सर्व पैसा मनपाच्या तिजोरीतूनच जात असताना, प्रशासन याबाबत वॉटरग्रेसवर कारवाई करण्यास मागे का हटत आहे ? असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

कोट..

शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्या जागेवर जावून प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये वॉटरग्रेसच्या कर्मचाऱ्यांनी वजन वाढविण्यासाठी करारनाम्यातील अटी-शर्थींचा भंग केल्याचे आढळून येते. याबाबत या कंपनीला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

-पवन पाटील, सहाय्यक आयुक्त

Web Title: The confusion of the Watergrass Company continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.