मनपाच्या भूमिकेचा मोकाट कुत्र्यांकडून अभिनंदनाचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:14 AM2021-01-14T04:14:03+5:302021-01-14T04:14:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत असून, मोकाट कुत्र्यांच्या चाव्यामुळे गेल्या आठ दिवसांत १५ ...

Congratulations from Mokat Dogs for the role of the Corporation | मनपाच्या भूमिकेचा मोकाट कुत्र्यांकडून अभिनंदनाचा ठराव

मनपाच्या भूमिकेचा मोकाट कुत्र्यांकडून अभिनंदनाचा ठराव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत असून, मोकाट कुत्र्यांच्या चाव्यामुळे गेल्या आठ दिवसांत १५ ते २० जण जखमी झाले आहेत. या समस्येमुळे नागरिकांचे रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडणेदेखील कठीण झाले आहे. त्यातच मनपा प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने आता मनपाच्या भूमिकेवर सर्वकडून संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ यांनीही ॲड. सुशील अत्रे यांनी सोशल मीडियावर मोकाट कुत्र्यांचा समस्येवर उपहासात्मक पोस्ट केली असून, ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल होत आहे. ॲड.अत्रे यांनी मनपा प्रशासनाच्या भूमिकेची उपहासात्मक शब्दांत चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

ॲड. सुशील अत्रे यांची व्हायरल झालेली पोस्ट

जळगाव मनपाने दाखविलेल्या संपूर्ण सहकार्याच्या समंजस भूमिकेबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा ठराव आज सकाळी आमच्या गल्लीतील सुमारे बेचाळीस कुत्र्यांनी एकभुकाने मंजूर केला. दरम्यान, श्वान बंधू भगिनींनी स्वसंरक्षणार्थ हलके चावे घेतलेल्या काही बालकांचे फोटो सतत छापून समाजात श्वानविरोधी जातीयवादी वातावरण तयार केल्याबद्दल स्थानिक वृत्तपत्रांचा तीव्र निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे श्वानांचे 'निर्बिजीकरण' ही अमानुष पद्धत केवळ मानवी अन्यायाचे प्रतीक असून ती प्रक्रिया उलट माणसांवरच केली जावी, म्हणजे उगीच रस्त्यात फिरणारी मोकाट मानवी बालके आटोक्यात येतील असा एक क्रांतिकारक विचार 'वैश्विक प्राणिमित्र संघटना' (जळगाव शाखा) यांनी मांडला आहे. यापुढे कोठेही 'कुत्रा' हा जातिवाचक शब्द वापरला गेला किंवा "हाड्" हा अपमानास्पद उद्गार कोणी काढला तर त्याच्यावर अत्यंत कठोर कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे. या अखिल श्वानमुक्ती चळवळीचा केन्द्रबिंदू यापुढे(ही) जळगाव शहर राहील, असे ठरविण्यात आले. गेल्या काही दिवसांत श्वान-चाव्यांमुळे जखमी झालेली लहान मुले, हे या चळवळीचे केवळ किरकोळ ‘कोलॅटरल डॅमेज्‘ समजण्यात यावे असेही ठरले.’ अशा शब्दांत मनपावर टीकास्त्र सोडले आहे.

मांस विक्रेत्यांना नोटीस काढा - आमदारांच्या मनपाला सूचना

शहरात मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढावा यासाठी आमदार सुरेश भोळे यांनीही बुधवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली. शहरात मांस विक्री करणारे दुकानदार उघड्यावर मांस फेकून देतात. यामुळे मोकाट कुत्री अधीक आक्रमक होत आहेत. त्यामुळे मांस विक्रेत्यांनी नोटिसा काढून उघड्यावर मांस न फेकता त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा सूचना आमदार भोळे यांनी मनपा आयुक्तांना दिल्या आहेत. यासह केंद्र सरकारकडून आलेल्या निर्देशांबाबत खासदार उन्मेष पाटील यांच्याशी चर्चा करून, तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असे ही आमदार भोळे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Congratulations from Mokat Dogs for the role of the Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.