पेट्रोल पंपावर काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:19 AM2021-06-09T04:19:17+5:302021-06-09T04:19:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पेट्रोल व डिझेल तसेच गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात तालुका काँग्रेसतर्फे शहरातील पेट्रोल पंपावर आंदोलन करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पेट्रोल व डिझेल तसेच गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात तालुका काँग्रेसतर्फे शहरातील पेट्रोल पंपावर आंदोलन करून या दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या. काँग्रेसचे जळगाव तालुकाध्यक्ष मनोज चौधरी यांच्या नेतृत्वात हे आंदाेलन करण्यात आले.
पेट्रोलने शंभर रुपयांचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली, तर डिझेल सुद्धा शंभर रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅस ९०० रुपये झाला असून आता या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण बनले आहे. मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलमधून कराच्या रूपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. ‘पेट्रोल-डिझेल शंभरपार, मोदी बस करा जनतेची लूटमार’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा जनरल सेक्रेटरी जमील शेख, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी, अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष मनोज सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, विकास सोनवणे, सचिन माळी, सुभाष भंगाळे, गोकुळ चव्हाण, राहुल गरुड, भिकन सोनवणे आदी उपस्थित होते.