केंद्र शासनाच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेसकडून आज भारत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:18 AM2021-09-27T04:18:21+5:302021-09-27T04:18:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनाने हुकूमशाही पद्धतीने केलेल्या कृषी कायद्याविरोधात व केंद्र शासनाच्या इतर धोरणांविरोधात काँग्रेसकडून सोमवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र शासनाने हुकूमशाही पद्धतीने केलेल्या कृषी कायद्याविरोधात व केंद्र शासनाच्या इतर धोरणांविरोधात काँग्रेसकडून सोमवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव शहरातील मुख्य बाजारपेठांसह मार्केट बंद ठेवण्यात यावे यासाठी आवाहन करण्यात येणार असून, केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांनी दिली.
या आंदाेलनाची माहिती देण्यासाठी रविवारी काँग्रेस भवन येथे काँग्रेसकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संदीप पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चाैधरी, महानगराध्यक्ष श्याम तायडे, प्रदेशचे उपाध्यक्ष याेगेंद्रसिंग पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाटील, प्रदीप पवार, ॲड. जमील शेख, डी.जी. पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विलास पाटील, प्रवक्ते याेगेश देसले आदींची उपस्थिती हाेती. देशातील जनतेला खाेटी आश्वासने देऊन भाजप पक्ष सत्तेत आला असून, जगाचा पाेशिंदा वर्षभरापासून दिल्लीत ठाण मांडून बसलेला आहे. तरीही या सरकारला त्यांची कीव येत नसून, उलट त्यांचा क्रूर पद्धतीने छळ केला जात असल्याचा आराेप ॲड. पाटील यांनी केला. भारत बंदमध्ये सहभागी हाेण्यासाठी बाजारपेठेत फिरून दुकानदार, व्यापाऱ्यांना आवाहन केले जाणार असून, शांततेत बंद पाळला जाणार असल्याचे सांगितले. काँग्रेसच्या या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील पाठिंबा दिला असून, सोमवारी यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्तेदेखील सहभागी होणार असल्याची माहिती संदीप पाटील यांनी दिली. या आंदोलनात युवकांनीदेखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे करण्यात आले आहे.