काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील भाजपा प्रवेशासाठी आग्रही - गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:26 PM2019-08-06T12:26:59+5:302019-08-06T12:28:32+5:30
उत्तर महाराष्टÑातून अपवाद वगळता सर्वच जण भाजपात येण्यास उत्सुक
जळगाव : गुलाबराव देवकर मला दोन वेळा भेटले. मनिष जैन तर कामानिमित्त नेहमीच भेटतात. देवकरांशी चांगली सकारात्मक चर्चा झाली. मात्र हवापाण्याबद्दल. काँग्रेसचे कुणाल पाटील हे आपणास भाजपात घ्या म्हणून आग्रही आहेत. उत्तर महाराष्टÑातून अपवाद वगळता सर्वच जण भाजपात येण्यास उत्सुक असल्याचा दावा जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी सायंकाळी अजिंठा विश्राम गृहावर आयोजित पत्रपरिषदेत केला. तसेच मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ७ रोजी जिल्ह्यात दाखल होत आहे. त्यावेळी चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.
आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, महापौर सीमा भोळे, बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे राष्टÑीय समन्वयक राजेंद्र फडके, भाजपा विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, नगरसेवक विशाल त्रिपाठी उपस्थित होते.
काश्मीरबाबतचा निर्णय ऐतिहासिक
काश्मीरचे कलम ३७० रद्द करून विभाजन करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला. हा ऐतिहासिक निर्णय असून १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा सर्वात चांगला निर्णय असल्याचे सांगितले. मी स्वत: काश्मीरमध्ये झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झालो असल्याचे ते म्हणाले.
विधानसभेला लाभ होईल की नाही हे जनतेवर अवलंबून
काश्मीरबाबतच्या निर्णयाचा कळत-नकळत का होईना भाजपाला महाराष्टÑाच्या विधानसभा निवडणुकीत लाभ होईल का? असे विचारले असता महाजन म्हणाले की, त्याबाबत जनताच काय ते ठरवेल. या निर्णयामुळे काँग्रेसची उरली-सुरली इभ्रतही गेली आहे.
डॉ.सतीश पाटील यांनी पैज मागे घ्यावी
डॉ.सतीश पाटील यांनी नियोजन समितीच्या बैठकीवेळी महाजन यांना आव्हान देत विधानसभा निवडणुकीत निवडून येण्याची पैज लावली. निवडून आलो नाही तर वडिलांचे नाव लावणार नाही, असेही ते बोलून गेले. अशी पैज लावायला नको होती. त्यामुळे मी ती मान्य केलेली नाही. ती त्यांनी मागे घ्यावी. मात्र ते पराभूत होतील, मी स्वत: लक्ष घालेन, ही पैज मात्र स्विकारली आहे, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले. भाजप-सेनेला २२० पेक्षाही अधिक जागा
भाजप २२० पेक्षा अधिक जागांचा दावाही करते अन दुसरीकडे सेनेशी युती असल्याचेही सांगते. नक्की काय? असे विचारले असता महाजन म्हणाले की, भाजपा असे म्हटलेले नाही. युतीला २२० पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा आहे. मात्र मला तर हा आकडा यापेक्षाही पुढे जाईल, याची खात्री आहे. त्यावर विरोधी पक्ष उरणार की नाही? असे विचारले असता विरोधक शिल्लक रहायला हवेत. मात्र सध्याच विद्यमान ८० विरोधी आमदारांपैकी ५० पेक्षा अधिक भाजपात येण्यास इच्छुक आहेत. जे येणार नाहीत, त्यापैकी किती निवडून येतील? याचीही खात्री नाही, असे सांगितले.
खान्देशात सर्वच भाजप प्रवेशासाठी इच्छुक
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी एक नव्हे दोन वेळा भेट घेतली, असे सांगत त्यांनी अधिक माहिती देणे टाळले. मात्र धुळे ग्रामीण मधील काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील हे मात्र भाजपात प्रवेशासाठी आग्रही असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. मात्र लोकसभा निवडणुकीत कुणाल पाटील स्वत:च्याच मतदार संघात १ लाखाच्या मतांनी मागे पडले. त्या निवडणुकीवेळीच त्यांना भाजपात प्रवेश करा, असे म्हटलो होतो. मात्र त्यांना काँग्रेसमधूनच निवडून येऊ, असे वाटत होते. त्यामुळे आले नाहीत. आता १०० टक्के लोकांना भाजपात यावेसे वाटतं. मात्र आमची युती आहे. त्यामुळे सगळ्यांनाच पक्षात घेऊन काय करणार? असा सवालही त्यांनी केला.
७ रोजी दाखल होणार महाजनादेश यात्रा
यावेळी पालकमंत्री महाजन म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा पहिल्या टप्प्याचा समारोप ९ आॅगस्ट क्रांतीदिनी नंदुबार येथे होणार आहे. जिल्ह्यात ७ रोजी बोदवडमार्गे यात्रा प्रवेश करेल. त्याच दिवशी जामनेरला सायंकाळी सभा होईल. तसेच मुक्कामही जामनेरात असेल. ८ रोजी सकाळी ९.३० वाजता मुख्यमंत्र्यांची जामनेर येथे पत्रपरिषद होईल. त्यानंतर भुसावळ येथे जाहीर सभा व दुपारी जळगाव येथे जाहीर सभा होईल. त्यानंतर धरणगाव, अमळनेरमार्गे ही यात्रा धुळे व नंदुरबारला जाईल.
मतपत्रिकेवर मतदान घेतले तरी फरक पडणार नाही
तुम्ही नेहमीच आकडे सांगतात व ते खरे होतात, असा विरोधकांचा आक्षेप आहे, असे विचारले असता महाजन म्हणाले की ईव्हीएमची चाबी माझ्याकडे नाही. खरेतर लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या विविध संस्थांच्या सर्वेक्षणावरून हे आकडे मिळाले होते. तसेच आताही मिळाले आहेत. लोकांना काय अपेक्षा आहेत? हे आम्हाला लोकांमध्येच काम करत असल्याने चांगले माहिती आहे. काँग्रेस मात्र गोंधळलेली आहे. विरोधी पक्ष पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडत आहेत. मतपत्रिकांवर जरी निवडणुका घेतल्या तरीही निकालावर १ टक्काही फरक पडणार नाही, असा दावा त्यांनी केला.
कुणाल पाटील यांची चुप्पी
धुळे ग्रामीणचे काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे विधान गिरीश महाजन यांनी केल्याने ‘लोकमत’ने कुणाल पाटील यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.