धुळ्य़ात डीपीडीसी निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:38 PM2017-09-28T13:38:18+5:302017-09-28T13:39:19+5:30

विजयी उमेदवारांचा जल्लोष : शिरपूरचे कॉँग्रेसचे दोन्ही उमेदवार पराभूत

Congress, NCP domination in DPDC elections in Dhule | धुळ्य़ात डीपीडीसी निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व

धुळ्य़ात डीपीडीसी निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व

Next
ठळक मुद्देनगरपंचायत गटाची जागा राष्ट्रवादीने जिंकली एक जागा बिनविरोध लहान नागरी गटाच्या दोन जागा भाजपाने जिंकल्या 

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 28 - जिल्हा नियोजन समितीच्या नऊ जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत कॉँग्रेसने 4 तर राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीने 2 जागा प्राप्त करत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तर लहान नागरी गटात भाजपाने 2 जागा जिंकल्या असून शिरपुरातील कॉँग्रेसचे उमेदवार प्रभाकर चव्हाण आणि छाया ईशी हे दोघी पराभूत झालेत. विजयी उमेदवारांनी निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जल्लोष केला. 
2011 च्या लोकसंख्येच्या निकषानुसार वाढीव 8 जागा, तर दोंडाईचा मतदार संघातून रिक्त झालेली 1 अशा 9 जागांसाठी डीपीडीसीची निवडणूक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन केंद्रावर घेण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात गुरुवारी सकाळी मतमोजणी झाली. सुरुवातीला ग्रामीण मतदार संघाची मतमोजणी झाली. त्यानंतर लहान नागरी मतदार संघ व नगरपंचायत मतदार संघाची मतमोजणी झाली. 
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुरवठा अधिकारी  दत्तात्रय बोरूडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी भारदे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे आदी अधिका:यांच्या उपस्थितीत मतमोजणी करण्यात आली. 
ग्रामीण मतदार संघात कॉँग्रेसचा वरचष्मा 
ग्रामीण मतदार संघाच्या नामाप्र स्त्री प्रवर्गातून  निवडणूक लढविणा:या कॉँग्रेसच्या उमेदवार ललिता सुरेश देसले (पाटण, ता. शिंदखेडा) या विजयी झाल्या. त्यांना 38 मते मिळाली. त्यांनी उषाबाई हरि ठाकरे (निजामपूर, ता. साक्री) यांचा पराभव केला. ग्रामीण मतदार संघाच्या अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गात दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात होते. त्यात कॉँग्रेसच्या नलिनी अशोक गायकवाड (सांगवी, ता. शिरपूर) यांनी 23 मते व राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या खटाबाई धनराज भिल (वार-कुंडाणे) यांनी 19 मते मिळवून विजय मिळविला. या मतदार संघात गुंताबाई श्रावण सोनवणे (पिंप्राड, ता. शिंदखेडा) या पराभूत झाल्या. त्यांना केवळ 9 मते मिळाली. ग्रामीण मतदार संघाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातून कॉँग्रेसचे राजू नाना मालचे (फागणे, ता. धुळे) हे  विजयी झाले आहेत. त्यांना 39 मते मिळाली. त्यांनी श्यामलाल सीताराम भिल (सोनगीर) यांचा पराभव केला. श्यामलाल यांना 12 मते मिळाली.  ग्रामीण मतदार संघाच्या सर्वसाधारण प्रवर्गात कॉँग्रेसचे उत्तमराव नारायण देसले हे 43 मते मिळवत विजयी झाले. तर उत्तमराव यांनी चंद्रकांत युवराज पाटील यांचा पराभव केला. त्यांना 10 मते मिळाली. 

लहान नागरी गटाच्या सर्वसाधारण प्रवर्गात भाजपाचे मोहनसिंग हुलेसिंग पाटील यांनी कॉँग्रेसचे प्रभाकर चव्हाण यांचा पराभव केला. मोहन पाटील यांना 32 तर प्रभाकर चव्हाण यांना 24 मते मिळाली. तर याच गटातील नामाप्र स्त्री प्रवर्गात भाजपाच्या वैशाली महाजन यांनी कॉँग्रेसच्या छाया ईशी यांचा पराभव केला. वैशाली महाजन यांना 32 तर छाया ईशी यांना 24 मते मिळाली. 

नगरपंचायत गटातील सर्वसाधारण प्रवर्गात राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे शरद निंबाजी भामरे (साक्री) विजयी झाले. त्यांना 20 मते मिळाली. भामरे यांनी निर्मला युवराज माळी यांचा पराभव केला. निर्मला माळी यांना 13 मते मिळाली. 

दरम्यान, यापूर्वी मोठय़ा नागरी मतदार संघातून (महापालिका क्षेत्र) अनुसूचित जाती प्रवर्गाच्या राखीव जागेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांचा एकच अर्ज आल्याने ही जागा बिनविरोध झाली आहे. तशी घोषणा जिल्हा नियोजन विभागातर्फे करण्यात आली आहे. 

Web Title: Congress, NCP domination in DPDC elections in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.