काँँग्रेसमध्ये दुकान भाड्यावरून राजकारण पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:31 AM2019-03-27T11:31:28+5:302019-03-27T11:32:21+5:30
पदावर गंडांतर : दोन दिवसांपूर्वीच केले होते आंदोलन
जळगाव : ऐतिहासिक ओळख असलेल्या कॉँग्रेसच्या वास्तूतील पार्किंगमधील मोकळी जागा भाड्याने देण्याच्या प्रश्नावरुन पक्षात राजकारण पेटले असून दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या कार्यालयासमोर रावेर लोकसभा मतदार संघाची जागा कॉँग्रेसला मिळावी म्हणून उपोषण करणाऱ्या महिला पदाधिकारी अरूणा पाटील यांना पदावरुन तडकाफडकी हटविण्यात आले. यामागे अर्थपूर्ण राजकारणाचा आरोप अरूणा पाटील यांनी यापूर्वी केला होता.
शहराच्या मध्यवर्ती भागात अगदी टॉवरनजीक कॉँग्रेसची शंभरवर्षापूर्वींची वास्तू आहे. पक्षातील दिग्गज नेत्यांनी या वास्तूला भेट दिली असल्याचे सांगितले जाते. या वास्तूच्या समोर वाहने पार्किंगसाठी मोकळी जागा आहे. या जागेत पूर्वी तीन ते चार दुकानांना जागा भाड्याने देण्यात आली होती. जवळपास ३५ ते ४० वर्षांपासून ही जागा भाड्याने देण्यात येत आहे.
मनपा कारवाईनंतर पेटले राजकारण
दोन महिन्यापूर्वी मनपा प्रशासनाने केलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईत कॉँग्रेस भवन आवारातील दुकानांवरही गंडांतर आले. ही अतिक्रमणे काढण्यात आल्यानंतर दोन दुकानांना पुन्हा मागे सरकवून जागा देण्यात आली. यावरूनच ठिणगी पडली. महिला महानगर प्रमुख अरूणा पाटील, परवेज पठाण यांनी दुकानांना जागा देण्यास विरोध केला. हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला.
आंदोलन भोवले
दुकाने काढली जात नसल्याने अखेर अरूणा पाटील यांनी आंदोलक पवित्रा घेऊन भिकमांगो आंदोलन केले. कॉँग्रेस भवनासमोर आंदोलन करून भिक मागितले व पक्षाचे नेते येतील त्यावेळी जमा निधी त्यांना देऊन तक्रार केली जाईल अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यावरून पक्षाची बेअबु्र झाली म्हणून जिल्हा पदाधिकारी नाराज होते. जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी याबाबत प्रदेश महिला जिल्हाध्यक्षांकडे तक्रारही नोंदविली होती.
पदावरून हकालपट्टी
पक्ष कार्यालयासमोर आंदोलन करून दोनच दिवस होत नाही तोच अरूणा पाटील यांच्याकडील महिला महानगर जिल्हा प्रमुख पदाचा कार्यभार काढून घेण्यात येऊन महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ यांच्याकडे जळगाव महानगराची जबाबदारीदेखील सोपविण्यात आली आहे. एकीकडे राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत असताना कॉँग्रेसपक्षात मात्र अंतर्गत लाथाळ्यांचे राजकारण सुरू असल्याचा प्रत्यय येत असून कार्यकर्त्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे.
भाड्याचा असा होतो विनियोग
कॉँग्रेस भवनातील जागा भाड्याने देऊन जे भाडे मिळते त्यातून कॉँग्रेस भवनाचा कार्यालयीन खर्च भागविला जात असल्याचे स्पष्टीकरण जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांनी या विषयावरून दिले होते.
दोन दिवसांपूर्वीच आंदोलन
रावेर लोकसभा मतदार संघाची जागा कॉँग्रेसला मिळावी व डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून युवक कॉँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष परवेज पठाण, महिला महानगर अध्यक्षा अरूणा पाटील व अन्य काही कार्यकर्त्यांनी कॉँग्रेस भवनासमोर बसून आंदोलन केले होते. २३ मार्चला त्यांचे हे आंदोलन झाले.