पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात लोटगाडीवरून दुचाकी ठेवून मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 05:40 PM2017-09-18T17:40:20+5:302017-09-18T17:42:13+5:30
काँग्रेसचे आंदोलन: मोदींच्या प्रतिमेवर केला पेट्रोल, पाण्याचा अभिषेक
आॅनलाईन लोकमत जळगाव, दि.१८- केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासन दिलेले असताना या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसतर्फे सोमवारी दुपारी लोटगाडीवर दुचाकी ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रस्त्यावर धरणे देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर पेट्रोल, डिझेल व पाण्याने अभिषेक घालून तसेच घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकाºयांना निवेदनही देण्यात आले. गेल्या ७२ दिवसांत पेट्रोलच्या दरात १६ रूपयांची तर डिझेलमध्ये ४ रूपयांची दरवाढ झाली आहे. पेट्रोल व डिझेलचे दर दररोज बदलत असल्यामुळे ही वाढ दिसून येत नाही. ही दरवाढ छुपी आहे. तसेच महाराष्टÑासह इतर राज्यात पेट्रोल-डिझेलच्या भावात असमानता दिसून येत असल्याने त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेसच्या सूचनेवरून जिल्हा काँग्रेसतर्फे या दरवाढीविरोधात सोमवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यात जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस डी.जी. पाटील, महानगराध्यक्ष डॉ.अर्जून भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश शिंपी, तालुकाध्यक्ष संजय वराडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. ऐनवेळी ठरले आंदोलन सुरूवातीला केवळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधाच्या घोषणा देऊन जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी लोटगाडीवर मोटारसायकल ठेवून मोर्चा काढण्याचे ठरले. त्यानुसार तातडीने लोटगाडी मागविण्यात आली. तसेच बाटलीत पेट्रोल, डिझेल तसेच पूजेसाठीचे हळद, कुंकू, तांदूळही एका पुडीत मागविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील रस्त्यावरच लोटगाडीवर दुचाकी ठेवून त्यावर तालुकाध्यक्ष संजय वराडे बसले. तर इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ती लोटगाडी लोटत व मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकारविरोधाच्या घोषणा दिल्या. मोदींच्या प्रतिमेला पेट्रोलचा अभिषेक त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर या पदाधिकाºयांनी रस्त्यावरच ठाण मांडत मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा सुरू केल्या. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेवर शहर कार्याध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी पेट्रोल, डिझेल व पाण्याचा अभिषेक करीत व हळदी, कुंकू वाहत निषेध व्यक्त केला. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती.