भूगोल दिनाला अध्यात्म्याची जोड, ‘उपेक्षित’ भूगोलात आता करियरच्याही संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:39 PM2020-01-14T12:39:10+5:302020-01-14T12:39:51+5:30
सर्व शास्त्रे एकवटतात पायथ्याशी
चुडामण बोरसे
जळगाव : सर्वव्यापी आणि सर्व समावेशक असूनही पदरी उपेक्षा घेऊन बदलत्या प्रवाहात आता ‘भूगोल’ही कात टाकीत आहे. भुगोलाची व्याप्ती वाढण्यास सुरुवात झाली आहे. यातील संबंधित विषय आता करियरच्या द्दष्टीने महत्वाचे ठरत आहेत आणि त्याकडे विद्यार्थ्यांचा ओढाही वाढला आहे.
भूगोलाला सर्व शास्त्रांची माता असेही म्हटले जाते. २२ डिसेंबर रोजी उत्तर गोलार्धात सर्वात मोठी रात्र असते. त्या दिवसापासून दिवसाचा कालावधी थोडा- थोडा वाढत जातो. १४ जानेवारी रोजी सूर्य कर्कराशीत संक्रमण करतो. आपल्या संस्कृतीनुसार उत्तरायण सुरु होते. भूगोल दिनाला अशी अध्यात्मिक किनारही लाभली आहे.
पृथ्वीवरील भूभाग, नद्या, समुद्र, वनस्पती, भोवतालचे वातावरण यांचा परस्परांवर आणि या सर्व घटकांतील बदलांचा सृष्टीवर होणारा परिणाम म्हणजेच भूगोल होय. भूगोल हा सर्वशास्त्रांसाठी उपयुक्त असा आहे. समुद्र शास्त्र, खगोल, हवामान, खनिज, वनस्पती आणि प्राणी यांचा अभ्यास यात होत असतो.
भूगोलात अशा आहेत करिअरच्या संधी
सर्व्हेअर, ड्राफ्टर, केंद्र किंवा राज्य सरकारच्या भूनियोजन, भूमापन, भूजलविकास, गुन्हेअन्वेषण, दूर संवेदन (रिमोट सेिन्सग) विभाग, शहर तसेच क्षेत्रीय विकासक, जीआयएस स्पेशालिस्ट (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम), हवामान विभाग, वाहतूक व्यवस्थापक, पर्यावरणीय व्यवस्थापक, शहर नियोजक तसेच डेमोग्राफर ( जनगणना कार्यालय) अशा ठिकाणी कामांची संधी मिळू शकते.
मकरसंक्रांतीला तिळगूळ वाटला जातो. ऋतुबदल होण्याचा हा दिवस भूगोलात महत्त्वाचा आहे. म्हणून याच दिवशी भूगोल दिन साजरा केला जातो. भूगोल तज्ज्ञ प्रा. सी. डी. देशपांडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार १९८६ मध्ये पुणे येथे पं. भीमसेन जोशी यांच्याहस्ते झाला होता. तेव्हापासून मकरसंक्रांतीच्या दिवशी डॉ. देशपांडे यांचा जन्मदिन भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो.
भूगोल कडे करियर म्हणून पाहिले पाहिजे. आता तर वैद्यकीय भूगोल ही संकल्पनाही पुढे येत आहे. भविष्यकाळात भूगोलात अनेक बदल होतील, त्यासाठी आपण तयार रहायला हवे.
- प्रा.एच.बी.पाटील,
नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव.
भूगोल हा सामाजिक विषय असल्याने त्याची उपयुक्तता वाढत आहे. आमच्या महाविद्यालयाने यासाठी नवीन असा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांसाठी जीआयएस आणि त्याच्या सॉफ्टवेअरचा मूलभूत अभ्यासक्रमाचाही यात आहे.
- प्रा. डॉ. एस.एन. भारंबे, मू.जे. महाविद्यालय, जळगाव.