संतांचे संगति, मनोमार्ग गति ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:11 PM2018-11-28T12:11:30+5:302018-11-28T12:11:55+5:30
मनुष्य जन्मात परमेश्वराच्या प्राप्तीचा एकमेव सुलभ उपाय सत्संग हाच आहे, असे अनेक संतांनी वर्णन केले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- ...
मनुष्य जन्मात परमेश्वराच्या प्राप्तीचा एकमेव सुलभ उपाय सत्संग हाच आहे, असे अनेक संतांनी वर्णन केले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- संतांचे संगति मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे संत एकनाथ महाराज म्हणतात. हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पारय । येणे साधती साधने तुटती भवाचि बंधने । संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देतो ग्वाही । एका जनदिनी संत । पूर्ण करीती मनोरक्ष संत रामदास यांच्या भाषेत सांगायचे झाले तर.
सत्संगतिचा महिमा कळेना ।
सत्संग कोठे श्रमल्या मिळेना ।।
सत्संगतीने तुटली कुबुद्धी ।
सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी ।।
मनुष्याच्या कल्याणाकरिता सर्वांत महत्त्वाची व पहिली गोष्ट म्हणजे त्याला ह्या गोष्टीची जाणीव पाहिजे किंवा त्याला ह्या गोष्टीचे ज्ञान व्हावयास पाहिजे की,
कोण मी कुठला कोठूनी आलो ?
कुठे जावयाचे मला ।
मनुष्याने असा विचार केला पाहिजे की, मला काय करावयाचे होते व मी काय करीत आहे. मनुष्य जीवन सर्वात श्रेष्ठ का आहे. मनुष्य जीवनात आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार करणे हेच ह्या जीवनाचे परम ईप्सित आहे. आत्मसुख कशात आहे. ह्या आत्म्याचा असलेला जगाशी संबंध कशा प्रकारचा आहे. गुरू कोणाला म्हणतात आणि मनुष्याला गुरू करणे कसे अनिवार्य आहे. सर्व गोष्टींचे एकमेव उत्तर म्हणजे ‘सत्संग’ करणे हे होय. वरील सर्व प्रश्नांचे निराकरण सत्संग केल्याने आपोआप पूर्ण होत जातात. ह्यासाठी चारवेद, अठरा पुराणे, सहाशास्त्रे यांनी सुद्धा गर्जुन गर्जुन पुन: पुन्हा हे आणि हेच सांगितले आहे की, सत्संग करा कारण ईश्वर प्राप्ती करण्यासाठी सत्संग हीच पहिली पायरी आहे.
‘सत्संग’ या शब्दाची सत् = सत्य हाच मुख्य आशय अथवा उद्देश आहे. बहुतेक वेळी बरीच माणसं सत्संग फक्त मनोरंजनासाठीच करतात; पण मनोरंजन करणे म्हणजे सत्संग नव्हे हा सत्संगाचा भावार्थ नाही. सत्संगाचा सत्संग करण्याचा महत्त्वाचा हेतू म्हणजे आत्म्याची उन्नती किंवा कल्याण व आत्म्याचे परमात्म्यात विलीनीकरण आहे. जी माणसे मनोरंजन करण्याच्या हेतूने सत्संग करतात व ज्यांची विचारधारणा फक्त गोडगाणे ऐकणे व मधुर वादन ऐकण्याची असते.
पण सत्संगाच्या मुख्य हेतूबद्दल ज्यांना आवड नसते अश्या व्यक्तींना सत्संगाचा परिपूर्ण लाभ प्राप्त होत नाही.
- दादा महाराज जोशी, जळगाव