सकारात्मक दृष्टिकोनातून व्हावी सातत्यपूर्ण वाटचाल- विवेक गोसावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:18 PM2020-07-06T17:18:57+5:302020-07-06T17:20:03+5:30
संकटाच्याच नव्हे तर कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोनातून सातत्यपूर्ण वाटचाल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी केले.
भुसावळ : कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात प्रचंड बदल होत आहे. आॅनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. त्यासाठी माध्यम म्हणून पाठ्यपुस्तकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर कशी पोहोचतील यासाठी निर्मिती प्रक्रियेतील सर्वच घटकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याने वेळेच्या आत विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचू शकली. त्यामुळे संकटाच्याच नव्हे तर कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोनातून सातत्यपूर्ण वाटचाल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी केले.
बारावी युवकभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित बारावी युवकभारती मराठी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी यांच्याशी आॅनलाईन संवाद या उपक्रमाच्या समारोपप्रसंगी गोसावी बोलत होते.
प्रारंभी डॉ.जगदीश पाटील यांनी गेल्या चार दिवसात हिरा बनसोडे, डॉ.प्रतिमा इंगोले, कल्पना दुधाळ, अनुराधा प्रभुदेसाई या लेखक-कवींनी शिक्षकांशी आॅनलाईन संवाद साधल्याचे सांगितले. तसेच वयाच्या ३४व्या वर्षी निर्मिती नियंत्रक या पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या गोसावी यांनी आतापर्यंतच्या आपल्या १२ वर्षांच्या कारकीर्दीत नेतृत्वगुण, कर्तबगारी व कल्पकता यांची वेळोवेळी चुणूक दाखवली असल्याचेही परिचयातून सांगितले.
मराठी भाषा तज्ज्ञ समितीच्या डॉ.माधुरी जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. आॅनलाईन संवाद सत्राच्या समारोपात महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक मोठ्यव संख्येने सहभागी झाले होते.