मला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचे षडयंत्र; त्या तक्रारीवर एकनाथ खडसेंचा खुलासा
By विलास.बारी | Published: October 16, 2022 08:37 AM2022-10-16T08:37:45+5:302022-10-16T08:38:38+5:30
जळगाव जिल्हा दूध संघात सहा लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार आमदार तथा दूध संघाचे मुख्य प्रशासक मंगेश चव्हाण यांनी दिली होती.
जळगाव : जिल्हा दूध संघातील चोरी प्रकरणात आपण आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा खुलासा आमदार एकनाथ खडसे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. तत्पूर्वी, स्वत:ला मुख्यमंत्रीपदाच्या लायक समजणाऱ्या आमदार एकनाथ खडसे यांनी विनाकारण कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करणे हे चुकीचे आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर केली होती.
जळगाव जिल्हा दूध संघात सहा लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार आमदार तथा दूध संघाचे मुख्य प्रशासक मंगेश चव्हाण यांनी दिली होती. त्यानंतर, दूध संघातील मालाची चोरी झाली असल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी खडसे यांनी करीत जळगाव शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत ते रात्रभर पोलीस ठाण्याच्या बाहेर झोपले होते, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली. मंत्री महाजन यांनी लोकमत कार्यालयाला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविले जाण्याची शक्यता खडसेंनी व्यक्त केली आहे.
जिल्हा दूध संघात दुधाची भुकटी व लोणी चोरी केल्याप्रकरणी आपण फिर्याद देत आंदोलन केले होते. त्यानंतर एलसीबीमार्फत आपल्याला कोणत्या तरी खोट्या गुन्ह्यात गोवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे एलसीबीच्या कर्मचाऱ्याने आपल्याला सांगितले. आपला आवाज दाबण्यासाठी कोणत्या तरी खोट्या गुन्ह्यात अडकविले जाण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.