मंदीतून सावरतेय जळगावातील बांधकाम क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 12:25 PM2019-09-06T12:25:53+5:302019-09-06T12:26:20+5:30
सणासुदीमुळे ग्राहकांचा घर खरेदीकडे वाढतोय कल
जळगाव : नोटाबंदी, जीएसटी आणि ‘रेरा’ अशा विविध कारणांमुळे मंदी आलेल्या बांधकाम क्षेत्रात सध्या सकारात्मक वातावरण तयार होऊ लागले असून सणासुदीमुळे ग्राहक घर खरेदीसाठी पुढे येत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. असे असले तरी कमी उत्पन्न असलेल्यांना ‘नॉन बँकिंग फायनान्स कार्पोरेशन’कडून (एनबीएफसी) पतपुरवठा थांबल्याने घरांची खरेदी कमी होत असल्याचेही चित्र बांधकाम क्षेत्रात आहे. या क्षेत्रातील मंदीच्या झळांमुळे ४० टक्के मजुरांच्या हातचा रोजगार गेला आहे तर नोटाबंदीच्या तुलनेत अजूनही घरांची विक्री निम्मीच होत आहे.
उत्पादन सेवा आणि विक्री क्षेत्रात मंदीचे वातावरण असताना जळगावात बांधकाम क्षेत्रातालाही झळ आहे. मात्र सध्या सणा-सुदीचा काळ या क्षेत्राला लाभदायक ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले असल्याचे बांधकाम व्यावसायिक सांगत आहेत.
यंदा पावसाळा चांगला असल्याने हंगामही चांगला येणार असल्याच्या अंदाजाने बांधकाम क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असून सणासुदीमुळे अनेक जण घरांबाबत विचारणा करून खरेदीलाही पसंती देत असल्याचे सांगण्यात येत आहे. यात गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधण्यासाठी अनेकांनी घराची पाहणी केली आणि जवळपास १०० घरांचे बुकिंग झाल्याचे सांगण्यात आले.
अल्प उत्पन्न असलेल्यांचा पतपुरवठा थांबला
कमी उत्पन्न असलेल्यांकडे उत्पन्नाचे कागदपत्रे नसल्याने राष्ट्रीयकृत बँकांकडून त्यांना पतपुरवठा होत नाही. असे चहा विक्रेते, रिक्षा चालक व इतर छोट्या व्यावसायिकांना ‘नॉन बँकिंग फायनान्स कार्पोरेशन’कडून (एनबीएफसी) पतपुरवठा होतो. मात्र एनबीएफसीकडूनही पतपुरवठा होत नसल्याने छोट्या व्यावसायिकांना घर खरेदीत अडचणी येत असल्याचे ‘क्रेडाई’चे राज्य सहसचिव अनिश शहा यांनी सांगितले.
तीन वर्षाच्या तुलनेत घरांची खरेदी कमीच
नोटाबंदी, जीएसटी लागू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्राला झळ बसू लागली. जीएसटीचा दरही कमी झाला व ‘रेरा’च्या तरतुदीही माहिती झाल्या आहेत. या स्थितीतही नोटाबंदीपूर्वीची स्थिती बांधकाम क्षेत्रात अद्याप आलेली नाही. पूर्वी महिन्याकाठी १००च्या वर घरांची विक्री होत असे. आता या क्षेत्रात सुधारणा होत असली तरी घरांची संख्या ५०च्या जवळपास जात असल्याचे बांधकाम व्यावसायिक विनय पारख यांनी सांगितले. असे तरी सणासुदीमुळे स्थिती सावरणार असल्याचे सकारात्मक चित्र निर्माण होत असल्याचे पारख म्हणाले.
६० हजारावर मजूर
जळगावात जवळपास १०० बांधकाम व्यावसायिक आहेत. कोणाकडे स्वत: नियुक्त केलेले मजूर नाहीत. सेंटरिंग, गिलावा, सुतारकाम, रंगारी, प्लबिंग आदी कामांचे कंत्राट दिले जाते. कंत्राटदार मजूर आणतात. यामध्ये सेंटरिंग काम करणारे जवळपास २० हजार व बांधकाम करणारेही २० हजार मजूर आहेत. यासह सुतारकाम,वायरमन, नळकाम, रंगारी, बिगारी अन्य सहाय्यककारी काम करणारे मिळून एकूण ६० हजार मजूर शहरात आहेत.
मजुरांच्या हाताला काम नाही
घरांची विक्री कमी होत असल्याने त्याची झळ मजुरांनाही बसत आहे. एकूण ६० हजार मजुरांपैकी ४० टक्के मजुरांचा रोजगार गेला आहे. या सोबतच जळगाव बांधकाम अभियंत्यांच्याही व्यवसायही ३० टक्क्यांनी मंदावला असल्याचे जळगाव जिल्हा सिव्हील इंजिनिअर असोसिएशनचे कार्यकारीणी सदस्य तुषार तोतला यांनी सांगितले.