बांधकाम ठेकेदारास अडीच लाखात लुटले; डोळ्यात मिरचीची पूड फेकत पाठित केले चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 07:29 PM2023-05-23T19:29:12+5:302023-05-23T19:29:34+5:30
दुचाकी व अडीच लाख रुपये हिसकावून तरुण पसार झाले.
भगीरथ माळी
धरणगाव (जळगाव) : जळगावहून अमळनेरकडे दुचाकीने जाणाऱ्या इसमास अडवून डोळ्यात मिरची पूड फेकत चाकूने तीन वार करण्यात आले. त्यांच्याकडील अडीच लाख रुपये लुटण्यात आले. ही थरारक घटना म्हसले ता. अमळनेरनजीक मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. बबलू उर्फ राजेंद्र रमेश सूर्यवंशी (३५, रा. ताडेपुरा, अमळनेर, हल्ली मु. मेहरूण, जळगाव) असे हल्ल्यातील जखमी इसमाचे नाव आहे. ते सेंट्रींग कामाची ठेकेदारी करतात.
अमळनेर येथे जाण्यासाठी मंगळवारी दुपारी ते दुचाकीने निघाले होते. त्याच्यासोबत प्लॉट व्यवहाराचे अडीच लाख रुपये होते. धरणगावपासून पाच किलोमीटर अंतरावर म्हसले गावाजवळ अचानक आलेल्या दुचाकीवरील सहा जणांनी त्यांना अडवले आणि त्यांच्या डोळ्यात तिखट घालून त्याच्या पाठीत चाकूने तीन वार केले. तसेच त्यांच्याकडील दुचाकी व अडीच लाख रुपये हिसकावून तरुण पसार झाले.
युवकांची सतर्कता
घटनेनंतर राजेंद्र हे जखमी अवस्थेत म्हसले गावाकडे निघाले. त्याचवेळी धरणगाव येथील तीन तरुण दुचाकीने येत होते. त्यांनी जखमी राजेंद्र यांना पाहिले आणि धरणगाव पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती केली. पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी घटनास्थळ गाठून जखमीस रुग्णालयात रवाना केले. सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनीही घटनास्थळी भेट दिली.