भुसावळात लोकवर्गणीतून विंधन विहिरीची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:53 PM2019-04-12T22:53:12+5:302019-04-12T22:54:48+5:30
भुसावळ शहरासह परिसरातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यामुळे पापानगरातील मुस्लीम समाज बांधवांनी लोकवर्गणीतून विंधन विहीर (बोरिंग) तयार करून पाण्याची सोय केली, तर गौसियानगरात युवकांनी बंद पडलेले हातपंप (हापसी) लोकवर्गणीतून दुरुस्ती करून पाण्याचा प्रश्न मिटविण्याचा प्रयत्न केला.
भुसावळ : शहरासह परिसरातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यामुळे पापानगरातील मुस्लीम समाज बांधवांनी लोकवर्गणीतून विंधन विहीर (बोरिंग) तयार करून पाण्याची सोय केली, तर गौसियानगरात युवकांनी बंद पडलेले हातपंप (हापसी) लोकवर्गणीतून दुरुस्ती करून पाण्याचा प्रश्न मिटविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, याच भागात बंद पडलेली (बुजलेली) विहीर युवकांनी पुढाकार घेऊन खोदण्यास सुरुवात केली आहे. शासनाकडून केवळ घोषणाबाजी होत आहे. प्रत्यक्षात कोणतीही मदत मिळत नसल्याची या भागातील रहिवाशांची ओरड आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदी पात्राने तळ गाठला आहे. त्यामुळे पाणीप्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. शहरांत बारा ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. घोटभर पाण्यासाठी लोकांवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
पापानगर भागामध्ये पाणी प्रश्न अत्यंत गंभीर झाल्यामुळे शासन दरबारी अनेक वेळा पाण्यासाठी नियोजन करण्याची मागणी केली गेली. मात्र दरवेळी करू, बघू, पाहू अशी उत्तरे मिळाली. प्रत्यक्षात कृती मात्र शून्य झाली.
मत्शिदीचे मौलाना आले पुढे
पाण्यासाठी आता स्वत: पुढाकार घेऊन काहीतरी नियोजन करावे लागेल या उद्देशातून पापानगर मशीदचे हजरत इरफान मौलाना व समाज बांधवांनी लोकवर्गणी करून पापानगरात बोरिंग केली. या भागाला या माध्यमातून सकाळी दोन व संध्याकाळी दोन तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
गौसियानगर भागांमध्येही पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. या ठिकाणी युवकांनी पालिकेची बंद पडलेल्या हातपंपाची तांत्रिकदृष्ट्या आलेली अडचण लोकवर्गणीतून दूर करून येथील भागातील परिसरातील नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था केली. शिवाय याच भागाच्या दुसºया टोकावरही अशाच पद्धतीने शेख मुख्तार शेख गफूर, शेख मुस्तफा मोहम्मद हरून खाटीक, रोशन इब्राहिम पिंजारी, कलीम अय्युब खान, अजिज शेख उस्मान, आबीद पिंजारी सरदार चव्हाण, शेख भुºया सद्दाम, आबीद याकूब पिंजारी या युवकांनी पुढाकार घेऊन दुसºया टोकावरचा बंद पडलेला हातपंप सुरू केला. यामुळे या भागातील नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
बुजलेली विहीर खोदली
९ वर्षापूर्वी बुजलेली विहीर या युवकांनी सकाळी व संध्याकाळी दोन सत्रामध्ये स्वत: उत्खनन करण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत या युवकांनी २३ फूट खोल विहिरीचे उत्खनन केले आहे. या भागातील वृद्ध, दिव्यांग महिला घोटभर पाण्यासाठी वणवण भटकत असतात.
वेळेप्रसंगी पाण्यासाठी भांडणतंटेही होतात. शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा काही उपयोग होत नसल्यामुळे स्वत: युवकांनी पुढाकार घेतला आहे. नागरिकांचे होणारे हाल विशेषता वृद्धांचे व महिलांचे हाल पाहिले जात नाही अशी वेदना नागरिकांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, ठराविक नगरसेवक पाहिजे त्या प्रभागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहेत. ‘जिसकी लाठी उसकी भैस’ असा प्रत्यय शहरवासीयांना येत आहे तर खासगी टँकरवाले अव्वाच्या सव्वा भावाने पाण्याच्या टँकरचा दर आकारत असल्याची स्थिती आहे.
पाण्यासारख्या गंभीर प्रश्नावर मात करण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून बंद पडलेली मशिदीच्या मालकीची बोर दुरुस्तीसाठी समाजबांधवांना आवाहन करण्यात आले. सर्वांच्या सहकार्यातून अखेर बोर दुरुस्त करण्यात आली.
-मोहमद इरफान राजा खान कादरी, मौलाना, पापानगर मशीद, भुसावळ.
पालिका प्रशासनाकडून नवीन विंधन विहिरींसाठी ठराव मंजूर झालेले आहेत. जुन्या विहिरीतील ही गाळ काढून उपसा करण्यात येईल व त्याद्वारे नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यात येईल. सध्या ज्या भागांमध्ये पाण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
-महेंद्रसिंग ठाकूर, पाणीपुरवठा समिती सभापती, भुसावळ नगरपालिका.