बांधकामाची मशिनरी ‘पीडब्ल्यूडी’त, शासनाचा निषेध
By सुनील पाटील | Updated: February 20, 2025 14:42 IST2025-02-20T14:42:37+5:302025-02-20T14:42:59+5:30
जळगाव : कामे करुनही निधी मिळत नसल्याने बांधकाम कंत्राटदरांनी काम बंद संघर्ष आंदोलन पुकारले असून गुरुवारी कंत्राटदार महासंघ, बिल्डर्स ...

बांधकामाची मशिनरी ‘पीडब्ल्यूडी’त, शासनाचा निषेध
जळगाव : कामे करुनही निधी मिळत नसल्याने बांधकाम कंत्राटदरांनी काम बंद संघर्ष आंदोलन पुकारले असून गुरुवारी कंत्राटदार महासंघ, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया व जळगाव जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बांधकामाची मशिनरी आणून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
शासनाने राज्यभर कंत्राटदारांची ४६ हजार कोटी रुपयांची बिले थकविली आहेत. जळगाव जिल्ह्यात ५५० कोटी रुपयांच्या निधीची गरज असताना ४४ कोटी रुपयांचा तुटपुंज्या निधी तोही जीएसटीसह अदा केला. शासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे चित्र राज्यभरात आहे. त्यामुळे नाईलाजाने विकासकामे बंद करावी लागत असून सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचे कंत्राटदरांचे म्हणणे आहे. यावेळी अधीक्षक अभियंत्यांना मागणी आणि निषेधाचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात महासंघाचे जिल्हाध्यक्ष राहूल सोनवणे, विलास पाटील, सुनील पाटील, कैलास भोळे, सुधाकर कोळी, रवींद्र माळी,अग्रवाल तसेच जिल्ह्यातील अनेक कंत्राटदार उपस्थित होते.