परवानगी न घेतलेल्या नाटेकरांच्या घराचे बांधकाम मनपाने पाडले
By Admin | Published: April 7, 2017 12:53 AM2017-04-07T00:53:36+5:302017-04-07T00:53:36+5:30
कारवाई : कर्मचाºयांच्या अंगावर कार घालण्याचा नाटेकर यांच्या मुलाचा प्रयत्न
जळगाव : मनपाची रितसर परवानगी न घेताच व कोणतेही साईड मार्जीन न सोडताच खेडी पेट्रोलपंप परिसरातील कॉलनीत अनधिकृतपणे बांधलेल्या मनपाचे सेवानिवृत्त कर्मचारी कॉ.अनिल नाटेकर यांच्या घरावर मनपा अतिक्रमण विभागाने गुूरूवारी धडक कारवाई करीत संपूर्ण घरच तोडण्यास सुरूवात केली. त्यात सायंकाळपर्यंत ६० टक्के घर तोडण्यात आले. उर्वरीत बांधकाम शुक्रवारी तोडण्यात येणार आहे. दरम्यान कारवाईसाठी आलेल्या महिला कर्मचाºयासह अन्य कर्मचाºयांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न करणाºया नाटेकर यांच्या मुलाविरूद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनपाच्या पाणीपुरवठा विभागातून सेवानिवृत्त झालेले व शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कॉ.अनिल नाटेकर यांचे खेडी परिसरात सर्व्हे नं.४८ मध्ये खेडी पेट्रोलपंपाजवळील वसाहतीत घर आहे. त्यांनी हे घर बांधताना पूर्ण २० बाय ४० फूटांच्या प्लॉटवर मनपाची कोणतीही बांधकाम परवानगी न घेता व साईड मार्जीन न सोडता बांधकाम केले. त्याबाबत तक्रार आल्याने नगररचना विभागाकडे त्याची सुनावणी झाली. त्यात समाधानकारक खुलासा न आल्याने अथवा नाटेकर यांनी त्यावेळीच दंड भरून बांधकाम नियमित करून न घेतल्याने तत्कालीन सहायक संचालकांनी २०१२ मध्येच नाटेकर यांच्या ६ मीटर बाय १२.५ मीटर (२० बाय ४० फूट) घराचे पूर्ण बांधकामच तोडण्याचे सकारण आदेश दिले होते. त्यानंतरही नाटेकर यांनी काहीही हालचाल केली नाही. दरम्यान या जुन्या सकारण आदेशांवर कारवाईच झालेली नव्हती. ते निदर्शनास आल्याने मनपा आयुक्तांच्या आदेशाने अतिक्रमण विभाग व नगररचना विभागाचे अधिकारी, कर्मचारी गुरूवारी कारवाईसाठी नाटेकर यांच्या घरी धडकले. त्यावर नाटेकर यांनी आधी नोटीस द्यायला हवी होती, अशी मागणी केली. मात्र रितसर सुनावणी होऊन सकारण आदेश झालेले असल्याने नोटीस देण्याची गरज नसल्याचे सांगत सामान काढून घेण्यासाठी रचना सहाय्यक विजय मराठे यांनी त्यांना अर्ध्या तासाची मुदत दिली. मात्र त्यांनी सामान काढून न घेतल्याने अतिक्रमण अधीक्षक एच.एम. खान यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाºयांनी जेसीबी व हातोड्याच्या सहाय्याने बांधकाम तोडण्यास सुरूवात केली. दुपारी साडेतीन वाजता या कारवाईस सुरूवात केली. सायंकाळपर्यंत सुमारे ६० टक्के बांधकाम तोडण्यात आले. सायंकाळ झाल्याने कारवाई थांबविण्यात आली.
पोलिसात तक्रार
अतिक्रमण अधीक्षक खान यांनी सांगितले की, कारवाई सुरू असताना नाटेकर यांच्या मुलाने कर्मचारी लक्ष्मीबाई जावळे,संजय परदेशी, नसीरूद्दीन भिस्ती यांच्या अंगावर चारचाकी वाहन घालण्याचा प्रयत्न केला. त्यात भिस्ती यांच्या पायाला खरचटले. याप्रकरणी लक्ष्मीबाई जावळे यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली आहे.