जळगावात महिला रुग्णालयाचे बांधकाम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:49 AM2018-05-04T11:49:58+5:302018-05-04T11:49:58+5:30
सुविधा
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ४ - जिल्हा रुग्णालयातील भार व कमी पडणारी जागा याला पर्याय म्हणून मोहाडी रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या स्वतंत्र महिला रुग्णालयाचे बांधकाम सुरू झाले असून दोन वर्षात हे रुग्णालय सुरू होण्याचा अंदाज आहे. यामुळे जिल्हाभरातील महिला रुग्णांना मोठा आधार होणार आहे.
जिल्हा रुग्णालयात दिवसेंदिवस गर्दी वाढू लागल्याने जागा व खाटा कमी पडू लागल्या. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र शासकीय रुग्णालय असावे, असा विचार पुढे आला व मोहाडी रस्त्यावर १०० खाटांच्या रुग्णालयास यापूर्वीच मंजुरी मिळालेली आहे.
रुग्णालय मंजुरीबाबत १० मार्च २०१६ रोजी झालेल्या सचिव समितीच्या बैठकीत निर्णय होऊन त्यानुसार मान्यता देण्यात आली. तसेच यासाठी शासनाने ७५ कोटी ३१ लाख २१ हजार रुपयांच्या अंदाजपत्रक व नकाशांना त्यावेळी प्रशासकीय मान्यता दिली. या रुग्णालयासाठी मोहाडी रस्त्यावर सहा एकर जागा मिळून ती हस्तांतरीतही झाली.
पाण्याची व्यवस्था झाल्याने दिलासा
सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन जानेवारी २०१८मध्ये सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर बांधकामासाठी पाण्याची गरज असल्याने त्यासाठी येथे कुपनलिका करण्यात आली व पाणी लागल्याने प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे.
सा.बां. विभागाकडून बांधकाम करून घेणार
आरोग्य विभागाकडे जागा हस्तांतरीत झाली असली तरी या जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकाम केले जाणार आहे. हे काम झाल्यानंतर रुग्णालय आरोग्य विभागाकडे येईल व येथे प्रत्यक्ष रुग्णसेवा सुरू होईल. साधारण दोन वर्षात बांधकाम पूर्ण होऊन हे रुग्णालय रुग्णसेवेत येईल, असा अंदाज आहे.
आवश्यक सुविधा मिळणार
येथे दाखल होणाºया महिलांसाठी आवश्यकता पडल्यास एक्स-रे मशिन, सोनोग्राफी मशिन व इतर संबंधित उपकरणेही येथे राहणार आहे. या सोबतच नवजात बालकांसाठी नवजात शिशू कक्ष व त्यामध्ये बालकांना ठेवण्यासाठी पेटीदेखील राहणार आहे. या ठिकाणी १०० खाटांचे महिला रुग्णालय तसेच मुख्य इमारत व अधिकारी-कर्मचाºयांचे निवासस्थान राहणार आहे. पहिल्या टप्प्यात रुग्णालयाचे काम होणार असून दुसºया टप्प्यात निवासस्थानांचे काम होईल, असे सांगण्यात आले.
मोहाडी रस्त्यावर उभारण्यात येणा-या महिला रुग्णालयाचे बांधकाम सुरू झाले असून यामध्ये पहिल्या टप्प्यात रुग्णालयाच्या इमारतीचे काम होईल व दुसºया टप्प्यात निवासस्थानाचे काम होणार आहे.
- डॉ.एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.