ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत सेतू केंद्रातील जादा रक्कम व एस.टी. स्मार्ट कार्डविषयी तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:09 PM2019-07-03T12:09:49+5:302019-07-03T12:10:15+5:30
चायनीज खाद्य पदार्थ्यांवर राहणार करडी नजर
जळगाव : पावसाळ््याच्या दिवसात अस्वच्छतेमुळे रोगराईचे प्रमाण वाढत असते. त्यातच चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरुन सर्रासपणे उघड्यांवर खाद्य पदार्थ्यांची विक्री होते. ही बाब लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील या खाद्य पदार्थ्यांची तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले. सेतू केंद्र चालकांकडून जास्त रक्कम आकारण्यासह एस.टी. स्मार्ट कार्डसाठी होणाऱ्या गैरसोयीचा मुद्दा बैठकीत मांडून अशासकीय सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस उप निरीक्षक दिलीप पाटील, अन्न व औषध प्रशासन विभागाचे व्ही. टी. जाधव, वैधमापन शास्त्र विभागाचे पी. पी. विभांडीक, कृषि विभागाचे संजय पवार, दूरसंचार विभागाचे एस. डी. उमराणी, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, अशासकीय सदस्य डॉ.अर्चना पाटील, पल्लवी चौधरी, अॅड.मंजुळा मुंदडा, विकास महाजन, साहित्यिक अ. फ. भालेराव, रमेश सोनवणे, बाळकृष्ण वाणी, शिवाजीराव अहिराव, सतीश गडे, उज्ज्वला देशपांडे, विजय मोहरीर, मकसूद हुसेन नुरुदीन बोहरी, विजयकुमार पारख, कल्पना पाटील, सतीष देशमुख, विकास कोटेचा, नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा
उघड्यावर मांस विक्रीस बंदी असूनही अनेक ठिकाणी उघड्यावर मांस विक्री होत असल्याचे दिसून येते. यावर सर्व संबंधित विभागाने तातडीने कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या.
एस.टी. स्मार्ट कार्डचा विषयावरून नाराजी
परिवहन महामंडळाचे (एस.टी.) स्मार्ट कार्ड घेण्यासाठी नागरीकांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते. जिल्ह्याच्या ठिकाणी येऊनही स्मार्ट कार्ड मिळत नाही याचा नागरिकांना मोठा त्रास होतो. यावर अशासकीय सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत हे कार्ड तालुक्याच्या ठिकाणी मिळावे, अशी सूचना अशासकीय सदस्यांनी केली असता एस. टी.चे स्मार्ट कार्ड जिल्ह्यातील कॉमन सर्व्हिस सेंटर मधून मिळावे. जेणेकरुन नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी परिवहन विभागास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्यात.
सेतू केंद्र चालकांकडून जादा रक्कम
सध्या शाळा, महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया तसेच शेतीचा हंगाम सुरु आहे. यासाठी नागरिकांना विविध दाखले आवश्यक असतात. यासाठी सेतू केंद्र चालकांकडून जास्त रक्कम आकारली जात असल्याची बाब बैठकीत निदर्शनास आणली असता सेतू केंद्रामार्फत पुरविण्यात येणाºया सर्व सेवांचे दर निश्चित केले आहे. यापेक्षा अधिक रक्कमेची कोणी मागणी करीत असेल तर तसे कळविल्यास त्याची तपासणी करुन सदरचे सेतू केंद्र बंद करण्याचा इशाराही जिल्हाधिकाºयांनी दिला. यावेळी अनेक अशासकीय सदस्यांनी ग्राहक हिताचे प्रश्न बैठकीत मांडले, यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेस दिल्यात.