फसवणूक झालेले पोलिसांच्या संपर्कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:19 AM2021-09-27T04:19:12+5:302021-09-27T04:19:12+5:30
जामनेर : संजय गांधी निराधार योजनेसह वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक लुबाडणूक झाल्याची तक्रार करण्यासाठी ...
जामनेर : संजय गांधी निराधार योजनेसह वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक लुबाडणूक झाल्याची तक्रार करण्यासाठी शहरातील नागरिक पोलिसांशी संपर्क साधत आहे.
दिव्यांगांना बनावट कार्ड बनवून देणाऱ्या टोळीतील काही जण शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना हुडकून त्यांना अनुदान मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न होत आहे.
याबाबत ‘लोकमत’ने बातमी प्रसिध्द केल्यावर फसवणूक झालेल्यांपैकी जामनेर येथील सुधाकर माळी यांनी उपनिरीक्षक किशोर पाटील यांचेशी संपर्क साधून कशी फसवणूक झाली, ते सांगितले. ‘लोकमत’मधील बातमी वाचून आपण पोलिसांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.
दिव्यांग, वृध्द, निराधार गरजूंना शासकीय योजनेच्या माध्यमातून मिळणारे अनुदान चरितार्थ चालवण्यासाठी सहायक ठरतात. या गरजेचा गैरफायदा काही दलाल घेत असून शासकीय योजनेचे प्रकरण करून देऊन पगार सुरू करून देण्याचे आमिष दाखवले जाते. यात गोरगरिबांची लूट होत असून अशा दलालांचा सध्या तहसील व पंचायत समिती परिसरात सुळसुळाट पाहावयास मिळत आहे.