कंटेनर महामंडळाचे आगार बंद, जिल्ह्यातील निर्यात ४० टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 12:37 PM2020-06-26T12:37:56+5:302020-06-26T12:38:11+5:30

उद्योगांना मोठा फटका : आर्थिक भुर्दंडामुळे वाढली चिंता

Container Corporation depot closed, exports in the district fell by 40 per cent | कंटेनर महामंडळाचे आगार बंद, जिल्ह्यातील निर्यात ४० टक्क्यांनी घटली

कंटेनर महामंडळाचे आगार बंद, जिल्ह्यातील निर्यात ४० टक्क्यांनी घटली

Next

जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख पिक असलेल्या केळीसह डाळ, मसाले, फळांचे रस यांच्या निर्यातीसह वेगवेगळ््या कच्च्या मालाच्या आयातीसाठी खान्देशावासीयांना सोयीचे असलेले भुसावळ येथील भारतीय कंटेनर महामंडळाचे आगार (डेपो) बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातून निर्यात होणाऱ्या मालावर परिणाम होऊन ४० टक्के निर्यात घटली आहे. यामुळे उद्योगांना मोठा फटका बसत असून सध्या माल निर्यात करायचा झाल्यास कंटेनर मुंबई येथे पाठवावे लागत आहे. त्यामुळे प्रति कंटेनर १० हजाराचा खर्च वाढला आहे.
१९९१पासून भुसावळ येथे असलेल्या भारतीय कंटेनर महामंडळाच्या आगाराचा जळगावातील केळीला परदेशवारी घडविण्यात मोठा वाटा राहिला. तसेच डाळ, मसाले, फळांचा रस, निर्जलीकरण केलेला कांदा व इतर बरेच पदार्थ ३० ते ३५ देशात निर्यात होऊ लागले. मात्र रेल्वेच्या जागेत असलेल्या या अगाराचे अचानक रेल्वेने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र हे परवडणारे नसल्याचे सांगत भारतीय कंटेनर महामंडळाने येथील कामकाज गुंडाळण्याचा निर्णय एप्रिल महिन्याच्या अखेरीस घेतला. तशी नोटीस रेल्वेला दिली व या विषयी आयात-निर्यातदारांनाही कळविले.
त्यानंतर ‘लोकमत’ने या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर दोन वेळा माल स्वीकारण्याची आगाराने तयारी दाखविली. ३१ मेपर्यंत हा माल स्वीकारण्यात आला. मात्र १ जूनपासून माल घेणे बंद केले.
कंटेनर आणले तर वाढीव १५ हजार रुपये द्या
३१ मेपर्यंत वेगवेगळ््या मालाचे कंटेनर स्वीकारल्यानंतर १ जूनपासून माल न घेण्याचे महामंडळाने ठरविल्याने या संदर्भात उद्योजकांना पत्र देऊन कंटेनर आणले तरी वाढीव १५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी अट घालण्यात आली. आगारच बंद करायचे असल्याने ही अट टाकून माल येऊच नये, या उद्देशाने ही पत्र देण्यात आली, असा आरोप उद्योजकांकडून करण्यात येत आहे.
निर्यात घटली
खान्देशातील उद्योग-व्यावसायिकांकडून होणाºया व्यवहारांमुळे या आगारात दरवर्षी आयातीचे एक हजार कोटी तर निर्यातीचे ७०० कोटी रुपये अशी एकूण १७०० कोटी रुपयांची उलाढाल होत असे. मात्र आता आगार बंद झाल्याने जिल्ह्यातून निर्यात होणाºया मालात ४० टक्क्याने घट झाल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात येत आहे. एक तर लॉकडाऊनच्या झळा बसलेले उद्योग आता अनलॉक -१ मध्ये सुरू होत नाही तोच आता निर्यातीवर परिणाम होऊ लागल्याने उत्पादनही जास्त करण्यास उद्योजक धजावत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
आर्थिक भुर्दंंड, जादा पैसे देऊनही कंटनर मिळेना
भुसावळ येथील आगार बंद झाल्याने निर्यातदारांना आता आपला माल मुंबई येथे पाठवावा लागत आहे. यात मुंबई येथूनच रिकामे कंटेनर मागवून ते भरल्यानंतर मुंबई येथे पाठवावे लागत आहे. त्यात आता कोरोनाच्या धास्तीने अनेक चालक येण्यास तयार होत नसल्याने जादा पैसे देण्याची तयारी दाखवून पाहिजे त्या प्रमाणात कंटेनर उपलब्ध होत नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यात जे कंटेनर मिळाले त्यातही प्रति कंटेनर १० हजार रुपयांचा खर्च वाढला आहे.
लोकप्रतिनिधी आता गप्प
खान्देशसाठी महत्त्वाचे असलेले हे आगार बंद झाले तरी एकाही लोकप्रतिनिधीने आवाज उठविला नसल्याबद्दल उद्योजकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सुरुवातीला हा विषय ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर माल स्वीकारण्यास मुदतवाढ मिळाली. यात काही लोकप्रतिनिधींनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आपण यासाठी चर्चा केल्याचा दावा केला. मात्र आता हे आगार बंद पडले तरी याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

भारतीय कंटेनर महामंडळाने आपले भुसावळातील आगार बंद केल्याने त्याचा आयात-निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. विविध देशात होणारी निर्यात जवळपास ४० टक्के कमी झाली आहे.
- डी.आय. देसर्डा, वरिष्ठ उपाध्यक्ष, जीएसटी विभाग, जैन उद्योग समूह.

भुसावळ येथील भारतीय कंटेनर महामंडळामुळे निर्यातवाढीस चालना मिळाली. मात्र जिल्ह्यासाठी सोयीचे असलेले हे आगार बंद केल्याने माल मुंबई येथे पाठवावा लागत आहे. यामुळे खर्च वाढला आहे.
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन, जळगाव

Web Title: Container Corporation depot closed, exports in the district fell by 40 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव