रिक्षातून पडल्यानंतर कंटेनरने तरूणीला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 02:11 PM2019-04-06T14:11:50+5:302019-04-06T14:12:03+5:30
बांभोरीजवळील घटना : रिक्षाचालकासह चार जण जखमी ; महामार्गावर वाहतूक ठप्प
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरी जकात नाक्याजवळ ओव्हरटेकच्या प्रयत्नात विद्यापीठातून प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला कंटेनरची धडक लागल्याने रिक्षा उलटली़ याचवेळी रिक्षेतून महामार्गावर पडलेल्या तरूणीला भरधाव कंटेनरने चिरडल्याने ती जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना शुक्रवारी सायंकाळी ५.५० वाजेच्या सुमारास घडली. श्रेया सुनील काजळे (वय २६ रा. संभाजी नगर) असे मयत तरुणीचे नाव आहे. दरम्यान, रिक्षा उलटल्याने रिक्षाचालकासह तीन विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अपघातामुळे घटनास्थळी वाहतूक विस्कळीत झाली होती.
विद्यापीठाच्या वित्त विभागात श्रेया काजळे ही तरुणी कंत्राटी पध्दतीने कामाला होती. सायंकाळच्या सुमारास विद्यापीठाचे कामकाज आटोपल्यानंतर श्रेया काजळे यांच्यासह काही विद्यार्थिंनी रिक्षाने (एमएच़१९़सीडब्ल्यू १५५६) शहराकडे येत होत्या. बांभोरी नाक्यापासून काही अंतरावर रिक्षा ही समोरील वाहनाला ओव्हरटेक करीत असताना अचानक समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरची धडक रिक्षाला बसली़ अन् क्षणातच धडकेतनंतर रिक्षा उलटली. त्यामुळे रिक्षेच्या उजव्या बाजुला बसलेली श्रेया काजळे ही रस्त्यावर पडली. याचवेळी जळगावकडून धुळ्याकडे जाणाºया व रिक्षाला धडक देणाºया कंटेनरच्या मागच्या चाकात श्रेया ही आली आणि अंगावरून चाक गेल्यामुळे ती जागीच ठार झाली. रिक्षा उलटल्याने रिक्षाचालक सोनु देवराम पाटील ( २७, रा. शिवाजीनगर), मिनाक्षी विकास बाविस्कर ( २५, रा. शनिपेठ), परमेश्वर पांडुरंग ताठे (३०, रा. केकतनिंभोरा ता. जामनेर), साक्षी धांडे (रा. नागपूर) हे तिन्ही विद्यार्थी जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच काहींवर प्राथमिक उपचार झाल्यानंतर खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले होते़ दरम्यान, कारचा कट लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे रिक्षाचालकाचे म्हणणे होते़
रिक्षेच्या पुढील भागाचा चुराडा
रिक्षा उलटल्यानंतर पुढील भागाचा पुर्णपणे चुराडा झाला होता़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव बी़बी़ पाटील व परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक बी़पी़पाटील, जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील, कर्मचारी अनिल लोहार, शैलेश पाटील यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले. अपघातानंतर महामार्गावर जवळपास अधार्तास वाहतूक विस्कळीत झाली होती.