जळगाव जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा
By Ajay.patil | Published: April 9, 2023 06:05 PM2023-04-09T18:05:19+5:302023-04-09T18:06:49+5:30
नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६५ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत होता.
जळगाव - जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील १ हजार हून अधिक गावांच्या पाणी पुरवठ्याची तपासणी केली असता, त्यात जिल्ह्यातील ३१ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा अहवाल पाणी नमुने तपासणी करणाऱ्या जिल्हा प्रयोगशाळेकडून देखील करण्यात आला आहे.
जि.प.कडून गेल्या महिन्यात हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात ही माहिती समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६५ गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत होता. आता त्यात घट होवून ती संख्या ६५ वरुन ३१ वर आली आहे. पावसाळ्यात मात्र दुषीत पाणी पुरवठा होण्याचे प्रकार वाढत असतात. दरम्यान, ज्या गावांमध्ये दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे आढळून आले आहे. त्या गावांमध्ये जि.प.प्रशासनाने गावातील नादुरूस्त व्हाल्व दुरूस्त करणे, गावातील गळत्या रोखणे, ज्या भागातून जलवाहीनी गेली आहे त्या भागातील उकीरडे उचलण्याबाबत पत्र देण्यात आले आहे .तसेच जलकुंभामध्ये ॲलम, तुरटी टाकून पाणी शुध्द देण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या गावांचा आहे समावेश..
जिल्ह्यातील ३१ गावांना सध्या अशुध्द पाणी पुरवठा होत असल्याचे आढळून आले आहे. त्यात सर्वाधिक ६ गावे रावेर तालुक्यातील आहे. यात कुंभारखेडा, बोरखेडासिम, कुसुंबा खु,कुसुंबा बु, कठोरा-धुरखेडा, कोळदा या गावांचा समावेश आहे. अमळनेर तालुक्यात खेडी खु,नंदगाव,पळासदळ,टाकरखेडा या गावांचा समावेश आहे. जळगाव तालुक्यातील विटनेर, तांडा, वराड, सुभाषवाडी, भडगाव तालुक्यातील बांबरूड, बोदवड तालुक्यात करंजी,धानोरी,धोंडखेडा, चोपडा तालुक्यात मोहीदा , उजाड, कर्जाने , धरणगाव तालुक्यात रोटवद, कंडारी बु, एरंडोल तालुक्यात जानफळ), जामनेरमधील तिघ्रे, टाकळी, मुक्ताईनगर तालुक्यात कोठा, पाचोऱ्यातील खाजोळे, पारोळ्यातील होलसर, कामतवाडी तर यावल मधील कठोरा गावांचा समावेश आहे.
९२९ गावांमध्ये शुध्द पाणी
जिल्ह्यातील १ हजार १५५ गावांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ३१ गावांमध्ये पाणी पुरवठा होत असल्याचे निष्पण्ण झाले. दरम्यान, गेल्या पाच वर्षांपासून सलग ज्या गावात साथ आली नाही, अशा गावांना सील्वर कार्ड दिले जाते, त्यात जिल्ह्यातील ९२९ गावांचा समावेश आहे. या ९२९ गावांमध्ये शुध्द पाणी पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.