संयम, अभ्यासात सातत्य आवश्यक- प्रियंका पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 09:40 PM2019-04-12T21:40:36+5:302019-04-12T21:40:45+5:30

वाकोदची सुन बनली उपजिल्हाधिकारी

Continuation of patience, study requires- Priyanka Patil | संयम, अभ्यासात सातत्य आवश्यक- प्रियंका पाटील

संयम, अभ्यासात सातत्य आवश्यक- प्रियंका पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देस्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी संयम आणि अभ्यासात सातत्य असणे आवश्यक असल्याचे उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेल्या डॉ.प्रियंका पाटील यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.


अर्पण लोढा ।
वाकोद, ता.जामनेर येथील सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक यशवंत त्र्यंबक पांढरे यांची सुन डॉ.प्रियंका सुधीर पांढरे (डॉ.प्रियंका पाटील) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खुल्या प्रवर्गात ५३६ गुण मिळवत राज्यात महिलांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. समांतर आरक्षणामुळे २०१६ पासून त्यांना ताटकळत बसावे लागले होते. सलग तिन्ही परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही पदरी निराशा पडत होती. याच आरक्षणामुळे २०१६ मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून संधी हुकली होती.
प्रश्न : यशाचे रहस्य काय?
उत्तर : जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि श्रम करण्याची तयारी असल्यावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवू शकतात.
प्रश्न : शिक्षण कुठे झाले?
उत्तर : प्राथमिक शिक्षण गावातच झाले,. पुढील शिक्षण भुसावळ येथे नवोदय विद्यालयातून घेतल्यानंतर मुंबई येथून बीडीएस पदवी घेतली.
प्रश्न : वडिलांनी तुम्हाला डॉक्टर बनविल्यानंतर तुम्ही प्रॅक्टीस करायचे सोडून स्पर्धा परीक्षेकडे कशा वळल्या?
उत्तर : शालेय जीवनापासून मनात कुठे तरी स्पर्धा परीक्षेविषयी ओढ होतीच. पण डॉक्टर व्हावे ही आई वडिलांची इच्छा असल्याने आग्रहास्तव मी बीडीएसला अ‍ॅडमिशन घेतली. पण त्यात मला पाहिजे तशी आवड वाटत नव्हती. अजून पुढे शिकण्याची प्रबळ इच्छा होती. माझे लग्न ठरल्यानंतर पतींना पहिल्या भेटीत स्पर्धा परीक्षेची कल्पना दिल्यानंतर त्यांनी मला याकडे वळण्यासाठी मोठी साथ दिली आणि माझा निर्णय पक्का झाला. मनात गाठ बांधली आपण स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचंच.
अनेकांचे लाभले मार्गदर्शन
प्रथम शाळेपासून मला आमच्या होळ गावचे शिक्षक साहेबराव चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रत्यक्षात एमपीएससीचा अभ्यास सुरू केल्यानंतर सोबतचे परीक्षार्थी मित्र, मनोहर भोळे, भूषण देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांचा माझ्या या यशात वाटा असल्याचे मला वाटते.
मोठी स्वप्ने पहा
आज मोबाइल आणि इंटरनेटमुळे जग छोटेसे खेडे बनले आहे. हवी ती माहिती क्षणात मिळते. त्याचा चांगला फायदा करून घ्या. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा मर्यादित वापर करा. मोठी स्वप्ने पहा व ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने रोज एक पाऊल पुढे टाका, असे आवाहनही प्रियंका पाटील यांनी केले.
होळवासीयांना अभिमान
पाचोरा तालुक्यातील होळ यासारख्या छोट्याशा गावात शेतात काबाडकष्ट करणारे शांताराम गोविंद पाटील यांच्या त्या कन्या आहेत. एका बापाच्या कष्टाचं आज चीज झालं आहे. याबद्दल होळवासीयांनाही अभिमान आहे.
ग्रामीण भागातील समस्या मला माहीत आहेत. या लोकांचे जीवन सुखकर कसे करता येईल याकडे मी प्राधान्याने लक्ष देईल. - डॉ.प्रियंका पाटील

Web Title: Continuation of patience, study requires- Priyanka Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.