पहाटे संततधार, अनेक ठिकाणी नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 10:48 PM2021-05-30T22:48:14+5:302021-05-30T22:48:45+5:30
जिल्ह्याच्या विविध भागात मध्यरात्रीपासून ते अगदी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस बरसला. पावसाळा तोंडावर असताना बरसलेल्या या मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्याच्या विविध भागात मध्यरात्रीपासून ते अगदी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस बरसला. पावसाळा तोंडावर असताना बरसलेल्या या मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे तर काही ठिकाणी या पावसामुळे नुकसान झाले आहे. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या या पावसामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.
पाचोरा तालुक्यात मोसमीपूर्व पाऊस
पाचोरा : विजांचा लखलखाट, ढगांच्या गडगडाटासह मोसमीपूर्व वळवाच्या पावसाने पाचोरा तालुक्यात जोरदार हजेरी लावत ३ तासात २५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यामुळे तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेग आला असून बळीराजा खडबडून जागा झाला. दि ३० रोजी मध्यरात्री ३.३०च्या सुमारास अचानक विजांचा लखलखाट व ढगांच्या गडगडाटासह तालुक्यात सर्वत्र मोसमीपूर्व पावसाने सुरुवात केली. वळवाचा पाऊस जोरदार बरसला सर्वत्र डबके साचले, पाणी वाहून निघाले. ३ तासात २५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तालुक्यातील नगरदेवळा-३० मिमी, पाचोरा -२९मिमी, गाळण-२५मिमी, वरखेडी-२८मिमी, कुऱ्हाड-२९मिमी, नांद्रा-३० मिमी, पिंपळगाव हरे-४ मिमी पावसाची नोंद झाली.
लोहारा परिसरात जोरदार पाऊस
लोहारा : रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या परिसरात झालेल्या जोरदार पूर्व मोसमी पावसामुळे शेतीच्या नुकसानीपेक्षा फायदाच अधिक होणार आहे. या परिसरात सध्या शेतात रोटाव्हेटरची, तसेच ठिबक कापसाच्या लागवडीसाठी नळ्या पसरविण्याचे काम सुरू आहे. साधारण चार ते पाच जूनच्या दरम्यान या परिसरात ठिबकच्या कापूस लागवडीला शेतकऱ्यांकडून सुरुवात होऊ शकते.
पहूर येथे दुकानांमध्ये पाण्याचा प्रवाह
पहूर, ता. जामनेर : पहूर येथे शनिवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर या ठिकाणी बसस्थानक परिसरात औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम सुरू असून या ठिकाणी पाण्याला प्रवाह न मिळाल्याने परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. दोन ते तीन तास जोरदार पाऊस झाला. रस्त्याचे काम करताना पाणी वाहून जाण्याबाबत विचार न केल्याने पाणी शिरून परिसरात असलेल्या महावीर मेडिकलचे नुकसान झाले. रात्रीच मेडिकलचे संचालक विजय इंदरचंद जैन यांनी जेसीबीच्या सहाय्याने पाणी प्रवाहित केले. त्यामुळे पुढील होणारी वित्तहानी टळली असून औषधी व फर्निचरचे नुकसान झाल्याचे जैन यांनी सांगितले आहे. याच ठिकाणी मगन गजानन मिस्त्री यांच्या फर्निचरच्या दुकानात पाणी शिरून साहित्याचे नुकसान झाले. रस्त्याचे काम सुस्थितीत न केल्यास स्थानिकांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
विजेचे खांब वाकले; अनेकांच्या छताचे पत्रे उडाले
पारोळा : तालुक्यात रविवारी (दि. २९) वादळी पावसाने हजेरी लावली. त्यात वीज वितरण कंपनीचे खांब कोसळून जमीनदोस्त झाले, तर काही ठिकाणी वीजवाहिन्या तुटून पडल्या आहेत. अनेक मोठमोठे वृक्ष उन्मळून पडली आहेत. अनेकांच्या घर, झोपडी व पोल्ट्रीफॉर्मचे पत्रे उडून गेल्याने अनेकजण बेघर झाले आहेत.रविवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने एक तास हजेरी लावली होती. या वादळामुळे अनेक ठिकाणी डेरेदार वृक्ष उन्मळून पडले. पारोळा - कासोदा रस्त्यावर के.आर. नगरमध्ये अनेक विजेचे खांब जमीनदोस्त झाले आहेत, तर काही वाकले आहेत. यामुळे वीजवाहिन्या तुटून पडल्या आहेत. खांब व वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच रस्त्यावर दशरथ महाजन यांच्या शेतातही अनेक झाडी उन्मळून पडली आहेत. शेतातच पोल्ट्रीफॉर्म होता. त्या शेडचेही पत्रे उडून दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले. शेतगड्याच्या झोपडीचे पत्रे उडून ते कुटुंब उघड्यावर आले. संपूर्ण रात्र या कुटुंबाने उघड्यावर काढली.
अमळनेरात वादळी पावसाने झाडे पडली
अमळनेर : तालुक्यात ३० रोजी संध्याकाळी वादळी पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी झाडे पडली तर काही ठिकाणी घरांचे , गोठ्याचे पत्रे उडून नुकसान झाले आहे सुदैवाने जीवित हानी झालेली नाही. तालुक्यात डांगर, जळोद, गंगापुरी, नालखेडा, मठगव्हान, रुंधाटी, पातोंडा, सावखेडा, मुंगसे, हेडावे, सुंदरपट्टी या भागात वादळी पाऊस झाला. डांगर येथे शेतांमध्ये पाणी साचून झाडे कोसळली विजेचे खांब पडले तारा तुटून पुरवठा खंडित झाला. हेडावे येथे रस्त्यावर झाडे पडून नाले वाहू लागले होते. या रस्त्यावरील एक हॉटेल आणि डेअरीचे नुकसान झाले आहे तर सुंदरपट्टी गावाला घरांचे पत्रे, गोठ्याचे पत्रे उडून नुकसान झाले. वीज तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित झाला.
चोपड्यात पुन्हा पाऊस
चोपडा : शहरासह तालुक्यातील शहराला लागून असलेले आजूबाजूच्या ग्रामीण भागात सायंकाळी पावणे पाच ते सहा वाजेच्या सुमारास अचानक पावसाचे वातावरण तयार झाले. लगेचच मध्यम स्वरूपाचे वादळ सुरू होऊन त्यानंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. जवळपास तासभर वादळी वारे आणि पाऊस सुरू होता. चोपडा शहरात सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस असल्याने पन्हाळ लागले होते. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगाम पूर्वमशागतिला फायदा होणार आहे. रात्री उशिरा पर्यंत वीज गुल झालेली होती. पश्चिम भागात सर्वत्र वीज पुरवठा खंडित झाला होता.