मुक्ताईनगरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 01:53 AM2018-12-19T01:53:16+5:302018-12-19T01:55:43+5:30
मुक्ताईनगर शहरात मोकाट व जखमी कुत्र्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. अखेर नगरपंचायतीने कुत्रे पकडण्याचे आदेश देऊन दिलासा दिला आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी २२ कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला. दरम्यान, अधिक उपाय योजना म्हणून मोकाट कुत्रे पकडण्यासाठी नगरपंचायतीने निविदा काढली आहे
मुक्ताईनगर : शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट व जखमी कुत्र्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. धसका घेतलेल्या नागरिकांना अखेर नगरपंचायतीने कुत्रे पकडण्याचे आदेश देऊन दिलासा दिला आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी २२ कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला. दरम्यान, अधिक उपाय योजना म्हणून मोकाट कुत्रे पकडण्यासाठी नगरपंचायतीने निविदा काढली आहे
शहरात मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार वाढला होता. ठिकठिकाणी भटकी कुत्री धुमाकूळ घालत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने होत आहे. अगोदरच भटके कुत्रे धुमाकूळ घालत असतांना त्यात भर म्हणून काही अज्ञातांनी बाहेरच्या कुत्र्यांना गावात आणून सोडल्याने ही कुत्री एकमेकांवर भुंकतात व हल्ला करत असतात. यातील काही कुत्रे पिसाळलेले असल्याने तसेच अनेक कुत्र्यांना खरुज व खोलवर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे हे कुत्रे बेभान होत नागरीकांना त्यांचा त्रास होण्याचा धोका प्रचंड प्रमाणात निर्माण झाला आहे.
याबाबत शिवसेना महीला आघाडीच्या उपजिल्हा संघटक सुषमा बोदडे - शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पालिकेला निवेदन देत कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. यावर कारवाई झाली नसल्याने महिला आघाडीतर्फे पुन्हा स्मरण पत्र देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
गेल्या चार ते पाच दिवसात अनेकांना बाधीत कुत्र्यांनी दंश केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर कुत्रे अंगावर आल्याने काही दुचाकी वाहनांचे किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन खाडकन जागे झाले व संबंधित सफाई कर्मचाऱ्यांच्या मुकादमांना मोकाट कुत्र्यांचा व डुकरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिलेत.
दरम्यान, १७ रोजी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शाम गोसावी यांच्या आदेशाने आरोग्य विभाग कार्यालयीन अधिक्षकांनी सफाई कर्मचाº्यांचे मुकादम अनिल तायडे व गणेश कोळी यांना लेखी आदेश देत कुत्र्यांचा व डुकरांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार कर्मचारी राजा हंसकर, कालीचरण तेजी, साजन फतरोड, गोपाल लोहरे, सागर चिरावंडे, मनोज ढेंडवाल अशा सफाई कर्मचाºयांचा समावेश असलेले पथक तयार केले गेले आणि सदर कर्मचाºयांनी एकाच दिवसात २२ कुत्र्यांना पकडले. त्यापैकी खोलवर जखमा झालेल्या काही कुत्र्यांना प्राथमिक उपचार करण्यात आले. व सर्व कुत्र्यांना बाहेर जंगलात सोडण्यात येणार आहे.
दरम्यान, अधिकच्या उपाय योजना म्हणून नगर पंचायतीने शहरातील मोकाट कुत्रे पकडण्याबाबत निविदा काढली आहे. ३० डिसेंबर ही निविदेची मुदत आहे.