जळगावमध्ये वीज निर्मितीसाठी ७७५ हेक्टर क्षेत्राचा करारनामा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 04:46 PM2023-08-16T16:46:23+5:302023-08-16T16:47:10+5:30
राज्यातील२९ लाख ग्राहकांपैकी सुमारे ४५ लाख ग्राहक हे कृषी ग्राहक आहेत आणि २२ टक्के कृषी ग्राहक वीज वापरतात.
कुंदन पाटील
जळगाव : मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजनेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्यासाठी जिल्ह्यातील ७५ क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ५२ दस्त नोंदविण्यात आले आहेत.
राज्यातील२९ लाख ग्राहकांपैकी सुमारे ४५ लाख ग्राहक हे कृषी ग्राहक आहेत आणि २२ टक्के कृषी ग्राहक वीज वापरतात. सध्या कृषी ग्राहकांना दिवसा आणि रात्री आवर्तन तत्त्वावर वीज पुरवठा केला जातो. रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. शेतकर्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. दुसरीकडे, राज्यातील उद्योग-व्यवसायांना त्यांची स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्यासाठी माफक दरात वीज पुरवठा करावा, अशीही जोरदार मागणी होत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या योजनेला बुस्टर दिले आहे. शुक्रवारी त्यांनी जिल्ह्यातील ७५ क्षेत्रांची निवड केली आहे. ७७४.८४ हेक्टर जमीनीवर ही योजना विस्तारण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यानुसार ७५ पैकी ५२ क्षेत्रांची दस्तनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
दिवसा मिळणार वीज
सदर जागांचा उपयोग सौर ऊर्जा निर्मिती करीता करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज मिळणे अपेक्षित आहे. ७५ जागांमध्ये महावितरण पहिल्या प्रकल्प समुहामध्ये 37 दस्त नोंदणीकृत करण्यात आले. दुसऱ्या प्रकल्प समुहामध्ये एकूण १५ दस्त नोंदणी कृत करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून ३८५ मेगाव्हॅट प्रदूषण मुक्त वीज निर्मिती होऊ शकणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा पुरेशी वीज उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच या योजनेला आकार दिला जात आहे. लवकरच वीज निर्मीतीची प्रक्रिया सुरु होणार आहे.
-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी.