आदर्श नगरात स्लॅब कोसळून ठेकेदाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:16 AM2021-01-23T04:16:20+5:302021-01-23T04:16:20+5:30
जळगाव : जुनी इमारत पाडत असताना अचानक दुस-या मजल्यावरचे स्लॅब कोसळल्याने या स्लॅबच्या खाली दबून अजबराव रूपचंद चंदनकर (४५, ...
जळगाव : जुनी इमारत पाडत असताना अचानक दुस-या मजल्यावरचे स्लॅब कोसळल्याने या स्लॅबच्या खाली दबून अजबराव रूपचंद चंदनकर (४५, रा. रेणुका नगर, रामेश्वर कॉलनी) या ठेकेदाराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता आदर्शनगरात घडली. दरम्यान, या घटनेत दौलत वंजारी (रा.धोबीवराड ता. पाचोरा) हा मजूर जखमी झाला असून त्याच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे.
अजबराव उर्फ अजय चंदनकर हे रेणूका नगरात पत्नी विद्या व मुलगा राहुल व बापु यांच्यासह वास्तव्यास होते. ते जुने इमारती तोडण्याचे काम घेत होते. त्यातून मिळणा-या पैशातून कुटूंबियांचा उदरनिर्वाह व्हायचा. या कामासाठी मुलगा राहुल हा त्यांना मदतीला असायचा. अजबराव यांनी आदर्शनगरातील मुख्य रस्त्यावरच्या एका जुन्या इमारतीचे बांधकाम तोडण्याचे काम घेतले होते. आठवडाभरापासून चार मजुरांच्या मदतीने ती इमारत तोडण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी ते इमारतीच्या दुसºया मजल्यावर खूर्ची ठाकून बसले होते. शेजारीच मजुर स्लॅब तोडत होता.
स्लॅबचे दोन तुकडे अन् ठेकेदाराचा मृत्यू
मजूर स्लॅब तोडत असताना अचानक स्लॅबच्या मध्यभागी मोठा तडा गेला़ तो मध्यभागातून दुभंगला आणि कोसळला. स्लॅबसह अजबराव खाली कोसळले व त्यात ते दबले गेले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. दुसरीकडे मजूर दौलत वंजारी हा सुध्दा स्लॅब कोसळल्याने गंभीर जखमी झाला.
वडिलांना वाचविण्यासाठी मुलाची धाव
या इमारतीच्या दुस-या खोलीत अजबराव यांचा मुलगा राहुल हा काम करीत होता. स्लॅब कोसळल्यानंतर वडील सुध्दा त्यासोबत खाली पडल्यामुळे त्याने लागलीच वडिलांना वाचविण्यासाठी धाव घेतली़ त्यानंतर वडील व मजूरास खाजगी वाहनातून तात्काळ जिल्हा रूग्णालयात हलविले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी यांनी अजबराव यांना मृत घोषित केले. हे एेकताच राहुल याने मन हेलवणारा आक्रोश केला. दरम्यान, स्लॅब कोसळल्यानंतर मजूर दौलत याला विजेचा जोरदार धक्का लागल्याचेही काहींनी सांगितले.
पत्नीला बसला मानसिक धक्का
पतीचा मृत्यू झाल्याचे कळताच पत्नी विद्या व लहान मुलगा बापू यांच्यासह नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली होती. नंतर त्यांनी प्रचंड आक्रोश केला. पतीच्या मृत्यूमुळे पत्नीला प्रचंड धक्का बसला़ अर्धा ते पाऊण तास त्या सुन्न झाल्या होत्या. दातखिळी सुध्दा बसली. बोलता सुध्दा येत नव्हते. तसेच शवविच्छेदन करण्यात येवू नये यासाठी मुलगा राहुल हा पोलिसांकडे विणविण्या करीत होता. दरम्यान, याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, ज्याठिकाणी घटना घडली ते घर कुठल्या व्यक्तीचे होते ते समजून आले नाही. परंतु, त्याठिकाणी नोटीस लावण्यात आलेली होती.