स्वाक्षरी न दिल्याने कंत्राटदाराने अभियंत्यावर फेकली फाईल, मनपात गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:42 PM2018-12-28T12:42:46+5:302018-12-28T12:43:13+5:30
काम झाल्यावरही स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ
जळगाव : मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून गोपाळपुरा भागातील नाल्याच्या पुलाचे काम होवून महिना झाल्यावरही बिलावर स्वाक्षरी होत नसल्याने, गुरुवारी मनपात शासकीय कंत्राटदार राहुल धांडे व शहर अभियंता डी.एस.खडके यांच्यात वाद झाला. स्वाक्षरीसाठी तब्बल २ तास बसवून ठेवल्यामुळे धांडे यांनी संतापात शहर अभियंत्यांवर फाईल फेकून दिली. त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यावर हा वाद शांत मिटविण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला २५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यातून शहरात तीन महिन्यांपासून कामे सुरु झाले आहेत. त्यातून गोपाळपुरा भागातील नाल्यालगत असलेल्या पुलाचे काम शासकीय कंत्राटदार राहुल धांडे यांनी घेतले होते. हे काम होवून एक महिना झााल्याची माहिती कंत्राटदार धांडे यांनी दिली. त्या कामाच्या साडे सात लाख रुपयाच्या बिलावर शहर अभियंत्यांची स्वाक्षरी आवश्यक असल्याने धांडे गुरुवारी शहर अभियंत्यांचा कार्यालयात दुपारी १ वाजेच्या सुमारास गेले. मात्र, शहर अभियंत्यांनी सायंकाळी स्वाक्षरी करु असे सांगितले. धांडे यांनी आपल्याकडे शुक्रवारी लग्न असल्याने स्वाक्षरी आताच करावी अशी विनंती केली. मात्र, स्वाक्षरी देण्यास खडके यांनी नकार दिला.
पायºयांवर झाला शाब्दिक वाद
स्वाक्षरी न देताच शहर अभियंते डी.एस.खडके हे आपल्या कार्यालयातून बाहेर आले. धांडे यांनी त्यांचा पाठलाग करून नवव्या मजल्यावरील पायºयांवर येवून स्वाक्षरी करण्याची विनंती केली. त्यावर खडके यांनी फाईल आपल्या दालनात ठेवा अशा सूचना धांडे यांना दिल्या. त्यामुळे धांडे यांनी संताप व्यक्त करत आजच स्वाक्षरी करा असे सांगितले. मात्र, खडके यांनी नकार दिल्यामुळे धांडे यांनी आपल्या हातातील फाईली व कागदपत्रे खडके यांच्या दिशेने फेकली. त्यानंतर शहर अभियंते सुनील भोळे व मनपाच्या काही अधिकाºयांनी धांडे यांची समजूत घालत हा वाद शांत केला.
कंत्राटदार धांडे हे याआधी दोन वेळा बिलांवर स्वाक्षरी घेण्यास आले होते व दोन्हीही वेळा त्यांच्या बिलांवर स्वाक्षरी केली आहे. गुरुवारी देखील त्यांनी बिले आणल्यानंतर त्यांना बिलांची फाईल टेबलवर ठेवण्यास सांगितली व सायंकाळी स्वाक्षरी करण्याचे त्यांना सांगितले. मात्र, त्यांनी काहीही ऐकून न घेता वाद घातला.
-डी.एस.खडके, शहर अभियंता, मनपा
महिनाभरापासून नाल्यावरील पुलाचे काम झाले आहे. शुक्रवारी बहिणीचे लग्न असल्याने पैशांची गरज असल्याने शहर अभियंत्यांकडून बिलांवर स्वाक्षरी करण्याची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडून टाळाटाळ केली जात आहे. काही बिलांवर आयुक्तांच्या स्वाक्षरीची गरज होती. आयुक्तांनी एका मिनीटात बिलांवर स्वाक्षरी केली. मात्र, शहर अभियंता स्वाक्षरी देण्यास टाळाटाळ करत आहेत.
-राहुल धांडे, कंत्राटदार