कंत्राटदाराला लुटणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:15 AM2021-04-06T04:15:55+5:302021-04-06T04:15:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कुसुंबा येथे मजुरांना सोडून परत नेरीला जात असताना बांधकाम कंत्राटदार सुधीर व्यंकटेश्वर रवीपती (४०, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कुसुंबा येथे मजुरांना सोडून परत नेरीला जात असताना बांधकाम कंत्राटदार सुधीर व्यंकटेश्वर रवीपती (४०, रा. नेल्लुर वेदायपाडम, जि. नेल्लूर, आंध्रप्रदेश, ह.मु.नेरी) यांना मारहाण करून लुटणाऱ्या निवृत्ती उर्फ भगवान शांताराम बाविस्कर (रा. जैनाबाद) व राहुल रामदास कोळी (रा. कोळीवाडा) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी अटक केली. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आकाश सुरेश चव्हाण (रा. रायपूर, ता. जळगाव) हा फरार आहे.
रवीपती यांच्याकडे शनिवारी रात्री एकाने रस्त्यात लिफ्ट मागितली आणि थोड्या अंतरावर चिंचोलीजवळ दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या चारचाकीच्या पुढे दुचाकी आडवी लावून मारहाण करुन १६ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, अंगठ्या व रोख रक्कम असा १ लाख २ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी रविवारी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू
या गुन्ह्यातील संशयितांबाबत पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनाच गुप्त माहिती मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे,सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, जितेंद्र राजपूत, किशोर पाटील, इम्रान सय्यद, विजय बावस्कर, मुदतस्सर काझी,हेमंत कळसकर,चंद्रकांत पाटील,सचिन पाटील, योगेश बारी, असिम तडवी व साईनाथ मुंडे यांच्या पथकाने सलग बारा तास शोध मोहीम राबवून तिघांना निष्पन्न केले. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली.