सागरपार्कवर मनपाचाच ताबा
By admin | Published: February 4, 2017 12:49 AM2017-02-04T00:49:22+5:302017-02-04T00:49:22+5:30
सर्वोच्च न्यायालय : लुंकड परिवाराची याचिका फेटाळली
जळगाव : सागरपार्कच्या जागेवर महापालिकेचाच ताबा असल्याचा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने याप्रश्नी लुंकड परिवाराने केलेली याचिका शुक्रवारी फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. मदन लोकुर व न्या. प्रफुल्ल सी.पंत यांच्या पुढे याप्रश्नी कामकाज झाले, अशी माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या स्व. नथमल लुंकड यांच्या मालकीची सागरपार्कची जागा होती. या जागेवर तत्कालीन पालिकेने वाचनालय, सुतिकागृह व उद्यान असे आरक्षण करून जागा संपादीत केली होती. त्यावेळी लुंकड परिवाराने पालिकेने ठरविलेल्या कारणासाठी जागेच्या संपादनास त्यावेळी सहमतीही दर्शविली होती. मात्र नंतर पालिकेने निर्धारीत वेळेत जागेचे संपादन केले नव्हते. त्यामुळे ही जागा पुन्हा ताब्यात मिळावी यासाठी लुंकड परिवाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र पालिकेने नगरविकास योजनेत (टी.पी.स्किम) मध्ये जागा संपादीत केल्याचे सांगून संबंधीतांना मोबदलाही देऊ केला होता. त्यामुळे न्यायालयाने लुंकड परिवाराने जागा ताब्यात मिळावी म्हणून केलेला दावाही नाकारला होता.
उच्च न्यायालयाकडून जागेचा ताबा मिळत नसल्याने लुंकड परिवाराने याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेत याचिका (स्पे. लिव्ह पिटीशन) दाखल केली होती. याप्रश्नी सर्वोच्च न्यालयात याप्रश्नी मनपा तसेच लुंकड परिवाराकडून युक्तीवाद झाला. न्या. मदन लोकुर, न्या. प्रफुल्ल सी. पंत यांच द्विसदस्य बेंचपुढे हा युक्तीवाद झाला. न्यायालयात मनपातर्फे अॅड. शिवाजी जाधव, अॅड. हिरेन रावल तर लुंकड परिवारातर्फे अॅड. मनोहर नाफडे, अॅड. अभय मनोहर, अॅड. चेला स्वामी यांनी काम पाहीले. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून मनपाची बाजुने निकाल देत सागर पार्कच्या जागेवर मनपाचा हक्क कायम ठेवला व लुंकड परिवाराची याचिका फेटाळली.