पोलिसांच्या पेट्रोलिंगवर रेडिओ फ्रिक्वेन्सीचे नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:20 AM2021-08-15T04:20:09+5:302021-08-15T04:20:09+5:30
संजय पाटील अमळनेर : चोरींवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि रात्रीच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांचे मॉनिटरिंग करणारी आरएफआयडी यंत्रणा ...
संजय पाटील
अमळनेर : चोरींवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि रात्रीच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांचे मॉनिटरिंग करणारी आरएफआयडी यंत्रणा अमळनेर शहरात स्वातंत्र्यदिनापासून कार्यान्वित होत आहे.
वाढत्या चोऱ्या आणि रात्रीचे गैरप्रकार रोखण्यासाठी रात्री पोलिसांची गस्त घातली जाते. गस्त प्रामाणिकपणे व्हावी म्हणून ठिकठिकाणी डायरी ठेवून त्यावर पोलिसांनी वेळ टाकून सह्या करण्याची पद्धत होती; मात्र अनेकदा नंतर व आधीच्या वेळेवर सह्या करून निभावून नेले जात होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनानुसार डीवायएसपी राकेश जाधव यांच्या सहकार्याने पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ठेकेदार प्रशांत निकम, सरजू गोकलाणी व प्रकाश मुंदडा यांचे योगदान घेतले. दीपक काटे यांनी आरएफआयडी यंत्रणा उभारली आहे.
काय आहे आरएफआयडी
गस्त घालणाऱ्या पोलिसांसाठी चार मॉनिटरिंग डिव्हाईस दिले जातील. शहरात चारही दिशेला विविध ठिकाणी ५० टॅग लावले आहेत. रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या आधारे त्या टॅगला डिव्हाईसने स्कॅन केल्यावर त्याची वेळ आणि हजेरीची नोंद होऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील त्याची नोंद होणार आहे. त्यामुळे कामचलावूपणा आता होणार नाही. त्यातून रात्रीच्या चोऱ्यांवर नियंत्रण मिळवता येईल. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी अमळनेरातून त्याचा शुभारंभ होणार आहे.
कोट
एखाद्या भागात चोरी झाल्यास त्या भागात पोलीस रात्री गस्तीला होते का आणि केव्हा होते याची माहिती यातून उपलब्ध होणार आहे. तसेच महाविद्यालय मुलींची शाळा याठिकाणी दिवसादेखील ही यंत्रणा कार्यान्वित असेल.
- जयपाल हिरे ,पोलीस निरीक्षक, अमळनेर.
रेडिओ फ्रिक्वेन्सी डिव्हाईस. अंबिका फोटो अमळनेर