अवाक्याबाहेर गेलेले सिमेंटचे दर नियंत्रणात आणा - ‘क्रेडाई’चे पालकमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:25 AM2019-05-03T11:25:17+5:302019-05-03T11:25:55+5:30
मागणी
जळगाव : बांधकाम व्यवसायातील महत्त्वाचा घटक असलेल्या सिमेंटच्या किंमती अवाक्याबाहेर गेल्या असून यामुळे बांधकामाचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे. सिमेंटची ही अवाजवी भाववाढ कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी ‘क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली.
पालकमंत्री पाटील हे १ मे रोजी जळगाव दौऱ्यावर आले असताना ‘क्रेडाई’ सोबत त्यांची बैठक झाली. त्या वेळी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात सिमेंटची अवाजवी भाववाढ हा प्रमुख मुद्दा ठरला. त्यावर उत्तर देताना पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली. या मागणीसह सिटी सर्व्हे कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्याने या ठिकाणी कामांना बराच वेळ लागत असल्याने पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे तसेच शहरांच्या विकासासाठी राबविण्यात येणाºया विकास नियंत्रण नियमावलीमध्ये छोट्या शहरांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
या वेळी संघटनेचे राज्य सहसचिव अनिश शाह, जळगाव शाखेचे अध्यक्ष निर्णय चौधरी, सचिव पुष्कर नेहेते, धनंजय जकातदार, प्रवीण खडके, श्यामकांत राणे आदी उपस्थित होते.
यंत्रणेतील त्रुटी दूर करा
या वेळी आर्कीटेक्ट असोसिएशननेदेखील पालकमंत्र्यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या. यात बांधकामाच्या मंजुरी प्रक्रियेसाठी मनपामध्ये सुरू करण्यात आलेली आॅनलाईन प्रणाली बाल्यावस्थेत असल्याने मंजुरी प्रक्रियेसाठी जास्त वेळ लागतो. या प्रणालीतील त्रुटी दूर होईपर्यंतआॅनलाईनसह मॅन्युअली पद्धतही सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर चोपडे, ललित राणे, प्रकाश गुजराथी आदी उपस्थित होते.
कृत्रिम वाळूला प्रोत्साहन मिळावे
सिव्हील इंजिनिअर असोसिएशनच्यावतीने दिलेल्या निवेदनात कृत्रिम वाळूला प्रोत्साहन मिळावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळी मिलिंद राठी, तुषार तोतला आदी उपस्थित होते.