‘त्या’ वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 05:06 PM2020-01-13T17:06:23+5:302020-01-13T17:07:10+5:30
वादग्रस्त पुस्तकामुळे छत्रपती शिवाजी महाराज व महाराजांवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. यासाठी या पुस्तकावर बंदी घालावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.
भुसावळ/मुक्ताईनगर, जि.जळगाव : जयभगवान गोयल लिखित ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकामुळे छत्रपती शिवाजी महाराज व महाराजांवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. यासाठी या पुस्तकावर बंदी घालावी आणि लेखकावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन भुसावळ येथे मराठा समाजातर्फे प्रांताधिकारी, तर मुक्ताईनगर येथे तहसीलदारांना मुस्लीम समाजातर्फे देण्यात आले.
दिल्लीत भाजप कार्यालयात शनिवारी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘सात जन्म घेतले तरी शिवाजी महाराजांच्या एका दिवसाची काय एका क्षणाचीसुद्धा बरोबरी करू शकत नाही.’ हा प्रकार निंदनीय आहे. यासाठी संबंधित लेखकावर कारवाई करावी, अशी मागणी मराठा समाज भुसावळ शहर व तालुक्यातर्फे भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. निवेदनावर मराठा समाजाचे शहराध्यक्ष किरण पाटील, नगरसेवक मुकेश गुंजाळ, सचिव प्रमोद पाटील, माजी नगरसेवक ललित मराठी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड.तुषार पाटील यांच्यासह शेकडो समाज बांधवांच्या सह्या आहेत.
दरम्यान, मुक्ताईनगर येथेही या पुस्तकाच्या निषेधार्थ मुस्लीम समाजातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी मनियार बिरादरीचे हकीम चौधरी, कॉंग्रेसचे जिल्हा सचिव आसिफखान इस्माईलखान, मराठा समाज सेवा संघाचे दिनेश कदम, शिवसेना जिल्हा संघटक अफसरखान, गंगाधर बोदडे, आतीकखान, आसिफ शेख उस्मान, रिजवान चौधरी, शेख असगर शेख, सादिक खाटीक, अहेमद ठेकेदार, वसीम कुरेशी, मुख्तार रबाणी आदी उपस्थित होते.