वादग्रस्त पोलीस निरीक्षक बकाले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
By विलास.बारी | Published: October 21, 2022 02:39 PM2022-10-21T14:39:01+5:302022-10-21T14:39:23+5:30
उच्च न्यायालयातही दिलासा नाहीच : आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण
जळगाव : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी फेटाळून लावला. मराठा समाजाच्या वतीने बकालेंच्या विरोधात खंडपीठात तब्बल ४७ वकिलांची फौज उभी राहिली होती.
स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना बकाले यांनी आपल्याच खात्यातील सहायक फौजदार अशोक महाजन यांच्याशी मोबाइलवर बोलताना मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. १४ सप्टेंबर रोजी बकाले यांना निलंबित करण्यात आले. तर १५ सप्टेंबर रोजी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला मराठा समाजाची बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यात विनयभंग, पोलीस अप्रितीची भावना चेतावनी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम वाढविण्यात आले होते. बकाले यांच्या अटकेसाठी पोलिसांची वेगवेगळी पथके ठाण्यासह इतर ठिकाणी जाऊन आली, मात्र ते मिळून आले नाहीत. अशातच त्यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता तोही फेटाळण्यात आल्याने बकाले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. डी. आर. काळे, मराठा समाजाच्या वतीने ॲड. मयूर साळुंखे, ॲड. अभयसिंह भोसले व इतर वकिलांनी युक्तिवाद केला होता. तपास अधिकारी उपअधीक्षक संदीप गावीत हे देखील न्यायालयात हजर झाले होते.