आमदार अब्दुल सत्तार व वाकडी ग्रामस्थांमध्ये वाद, प्रकरण दाबत असल्याचा ग्रामस्थांवर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:45 PM2018-06-15T12:45:39+5:302018-06-15T12:45:39+5:30
वाकडी येथे सकाळपासूनच राजकीय मंडळींसह सामाजिक कार्यकर्त्यांची रिघ
जामनेर, जि. जळगाव - जामनेर तालुक्यातील वाकडी येथे मातंग समाजाच्या मुलांना मारहाण झाल्यानंतर शुक्रवारी गावामध्ये सकाळपासूनच राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते भेट देत असून गावकऱ्यांशी चर्चा करीत आहेत. दरम्यान, आमदार अब्दुल सत्तार यांनी गावात भेट दिल्यानंतर ग्रामस्थ व आमदार सत्तार यांच्यात वाद झाला.
विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेले म्हणून सचिन चांदणे व राहुल चांदणे (रा. वाकडी, ता. जामनेर) या मातंग समाजाच्या दोघं अल्पवयीन मुलांना नग्न करून मारहाण करीत त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील वाकडी येथे घडला होता. हा प्रकार गुरुवारी सर्वत्र समजल्यानंतर गावात विविध क्षेत्रातील मंडळी भेट देत आहेत.
शुक्रवारी सकाळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गावात भेट देऊन माहिती जाणून घेतली. या सोबतच माजी खासदार, डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, ज्योत्स्ना विसपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गरूड, राजू वाघमारे, सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे, लोकसंघर्ष मार्चाच्या प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे आदींनी गावात भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.
राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करू नये
वाकडी येथे आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट दिली त्या वेळी ग्रामस्थांनी त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना सांगितले की, आमच्या गावात जातीय वाद नाही, तुम्ही राजकीय मंडळी वाद वाढवू नका. त्यावर आमदार अब्दुल सत्तार म्हणाले, आम्हाला माहित आहे, तुम्ही काय करीत आहे. हे प्रकरण तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यावरून ग्रामस्थ व आमदार सत्तार यांच्यामध्ये वाद झाला.
दबावाखाली काम करू नका
पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनीही गावात भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. त्या वेळी आमदार सत्तार यांनी कराळे यांना दबावाखाली काम करू नका, अशा सूचना दिल्या.
पोलिसांनी विहीर बदलविल्याचा आरोप
मुकुंद सपकाळे यांनी गावात भेटी दरम्यान पोलिसांनी पंचनामा करताना विहीर बदलविल्याचा आरोप केला.
दरम्यान, या प्रकरणातील मारहाण करणारे ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार हे दोघे जळगाव येथे न्यायालयीन कोठडीत आहेत.