पालिका निवडणुकीवरून वादातून हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:26 AM2018-06-18T01:26:06+5:302018-06-18T01:26:06+5:30
चाळीसगाव : १० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल
चाळीसगाव (जि.जळगाव) : पालिका निवडणुकीच्या पूर्ववैमनस्यावरून आवडाप्पा बाळाप्पा गवळी यांना एका जमावाने शिवीगाळ करीत हातात लाठ्या-काठ्या घेऊन मारहाण केली. ही घटना १७ रोजी दुपारी ३ वाजता हिरापूर रोडवरील आदर्श नगरातील आप्पा दुग्धालयाजवळ घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.
आप्पा दुग्धालयात आवडाप्पा गवळी हे काऊंटरवर बसले असता संतप्त जमावाने अचानक वीट काऊंटरसमोर फेकली. नंतर गवळी यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली व काही वेळाने हातात लाठ्या-काठ्या घेऊन त्यांचे अंगावर धाऊन गेले.
पालिकेच्या मागील निवडणुकीमध्ये दुसऱ्या घरातील व्यक्ती निवडून आले. या कारणावरून ही घटना घडली. शहर पोलिसात आप्पा उर्फ श्याम नारायण गवळी, गुलाब गोविंदा गवळी, शंकर मालाप्पा गवळी, चेतन गुलाब गवळी, अविनाश गवळी, काशीनाथ गवळी, अमोल गवळी, ललित गवळी, रामू गवळी, अनिकेत गवळी यांच्याविरुद्ध दंगल व जमावबंदीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पंजे करीत आहे.
दरम्यान, सायंकाळी पोलीस उपअधीक्षक अरविंद पाटील यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन या घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र रसेडे यांच्याकडून घेतली.