जामनेर शिक्षण संस्थेतील वादाने मुख्याध्यापक नियुक्ती रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 04:33 PM2020-02-27T16:33:24+5:302020-02-27T16:34:29+5:30
वेतनास विलंब होत असल्याने न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी शुक्रवारपासून दोन दिवस शाळेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
जामनेर, जि.जळगाव : वेतनास विलंब होत असल्याने न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी शुक्रवारपासून दोन दिवस शाळेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. २ मार्चपासून शालेय कामकाजावर बहिष्कार घालणार असल्याचे निवेदन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले.
जामनेर शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळातील वादामुळे न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापकांची नियुक्ती रखडली आहे. प्रभारी मुख्याध्यापक बी.आर.चौधरी यांच्याविरुद्ध संस्थेचे सचिव सुरेश धारिवाल यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यापूर्वीच त्यांनी अर्जित रजा टाकल्याने शिक्षण विभागाने एस.पी महाजन यांची या पदावर नियुक्ती केली. संस्थेच्या दुसºया गटाच्या अध्यक्षांनी त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतल्याने महाजन यांची नियुक्ती रद्द केली. तेव्हापासून शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक पद रिक्त आहे.
जानेवारी व फेब्रुवारी या महिन्याचे वेतन देयक मुख्याध्यापकांच्या सहीशिवाय आॅनलाईन अपलोड होत नसल्याने कर्मचारी वेतनापासून वंचित आहे. १४ फेब्रुवारीला शिक्षकांनी याबाबत गटशिक्षणाधिकाºयांना निवेदन दिले होते. मात्र अद्याप काहीही कार्यवाही न झाल्याने आज शिक्षकांनी गटशिक्षणाधिकाºयांना पुन्हा निवेदन दिले.
राजकारणामुळे शिक्षण विभाग हतबल
जामनेरच्या शिक्षण संस्थेतील राजकीय कुरघोडीमुळे मुख्याध्यापक पदाची नियुक्ती रखडली असून, दोन्ही गटाकडून दोन वेगवेगळ्या नावांची शिफारस केली जाते. राजकीय हेवेदाव्यांमुळे शिक्षण विभागाकडून नियुक्ती केली जात नाही, अशी चर्चा आहे.
दरम्यान, संस्थेच्या एका गटाने शिक्षण मंत्र्यांपर्यंत हे प्रकरण पोहचविले. मात्र गेल्या आठवड्यात संबंधित मंत्र्यांनी फाईल शिक्षण विभागाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले.