अजिंठा चौफुलीच्या नामांतराचा वाद, ३ गट समोरासमोर आल्यानं वादंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 04:52 PM2022-01-18T16:52:38+5:302022-01-18T16:52:49+5:30
मंगळवारी सकाळी याठिकाणी तीन गट समोरासमोर आल्यानं तणाव निर्माण झाला होता.
प्रशांत भदाणे
जळगाव - जळगावात सध्या अजिंठा चौफुलीच्या नामांतराचा वाद उभा राहिला आहे. मंगळवारी सकाळी तीन गट समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला होता. महामार्गाच्या विस्तारीकरणात अजिंठा चौफुलीवर सर्कल उभारण्यात आला आहे. या सर्कलला काय नाव द्यावं, या मुद्द्यावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे.
मंगळवारी सकाळी याठिकाणी तीन गट समोरासमोर आल्यानं तणाव निर्माण झाला होता. एका गटानं अजिंठा चौफुलीचं नामकरण सरदार वल्लभभाई पटेल चौक असं करण्याची मागणी केली, तर दुसऱ्या गटानं मीर शुक्रुल्ला सर्कल नावाचा आग्रह धरला. दोन्ही गटांनी वेगवेगळ्या नावाचे फलकही त्याठिकाणी आणले होते. या प्रकाराची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. हा वाद सुरू असतानाच स्थानिक नागरिकांनी वेगळीच मागणी केली. अजिंठा चौफुलीच्या नामांतराला हरकत घेत त्यांनी चौफुलीचं नाव कायम ठेवण्याचा आग्रह धरला.